वीज चोरी अंगलट; बाप-लेक आरोपी

वीज वापराची नोंद वीज मीटरमध्ये कमी प्रमाणात होईल, अशी कायम स्वरूपी व्यवस्था करून 71 हजार 420 रूपये किंमतीची वीज चोरी केल्या प्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र
राज्य विद्युत वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप सावंत (रा. रासणेनगर, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय नरसिंह चिंतामणी व पंकज दत्तात्रय चिंतामणी (दोघे रा. सिध्दिविनायक सोसायटी, सावेडी, अहमदनगर) या बाप-लेकाविरूध्द विद्युत कायदा 2003 मधील कलम 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांच्यासह त्यांच्या भरारी पथकातील सहायक अभियंता गफ्फार शेख, कनिष्ठ अभियंता अशिष नावकार, तंत्रज्ञ यशवंत वेदपाठक यांनी 11 मार्च, 2022 रोजी दत्तात्रय चिंतामणी यांच्या सिध्दिविनायक सोसायटीमधील घरी वीज मीटरची तपासणी करण्याकामी भेट दिली होती.
चिंतामणी यांच्या घरातील वीज मीटरची तपासणी केली असता ते 78.84 टक्के मंद गतीने चालत असल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आले. चिंतामणी यांनी वीज वापराची नोंद वीज मीटरमध्ये कमी प्रमाणात होईल, अशी कायम स्वरूपी व्यवस्था केल्याचेही पथकाच्या लक्षात आले.
एकुण 71 हजार 420 रूपये किंमतीची तीन हजार 467 युनिट वीज चोरी केल्याप्रकरणी चिंतामणी यांना तडजोडीअंती आठ हजार रूपये रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले होते. चिंतामणी यांनी ती रक्कम भरली नसल्याने अखेर गुरूवार, 7 एप्रिल, 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.