पीएसआयला दगडाने मारहाण करत हातपाय फ्रॅक्चर केले, आरोपी पोलिसांकडून जेरबंद

बुलढाणा येथोल पोलीस उपनिरीक्षकास प्रवासादरम्यान छत्रपती संभाजी नगर रोडवर शेंडी (ता.नगर) गावच्या शिवारात दगडाने जबर मारहाण करत त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर करणाऱ्या दोघा आरोपींपैकी एकाला एमआयडीसी पोलिसांनी पुण्यात पकडले आहे.
तर त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे स.पो.नि. राजेंद्र सानप यांनी सांगितले. बुलढाणा येथील पोलीस उपनिरीक्षक दिनेश प्रल्हाद शिरेकर हे दि.२८ मार्च रोजी नगर ते छत्रपती संभाजी नगर महामार्गाने प्रवास करत असताना शेंडी (ता.नगर) येथे त्यांचे कुटुंबीयांसोबत थांबले असताना अज्ञात २ इसमांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या पायावर मोठा दगड टाकून गंभीर जखमी केले होते.
त्यामध्ये त्यांचे दोन्ही पायांची हाडे फ्रॅक्चर झालेली होती.याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना यातील एक आरोपी संकेत बाजीराव ससे हा पुणे येथे राहत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तातडीने पुणे येथे जावून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्हा घडल्यानंतर पळून जाण्यासाठी वापरलेली मारुती सेलेरीओ कार जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. राजेंद्र सानप, उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलिस अंमलदार नंदकुमार सांगळे, सुरेश सानप, नवनाथ दहिफळे यांनी केली आहे.