बनावट दस्त करून शेतकऱ्याच्या शेत जमिनीची खरेदी

अहमदनगर- वडिलोपार्जित शेत जमिनीवर नाव लावल्याचा बहाणा करत बनावट दस्त तयार करून शेतकरी रफिक शहाबुधीन शेख (वय 70 रा. नांगरे गल्ली, आशा टॉकीज चौक, नगर) यांच्या नावे असलेली 0.83 आर जमीनीची खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेले रफिक शहाबुधीन शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद अरफत शौकत बागवान (रा. बेलदार गल्ली, नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रफिक शहाबुधीन शेख यांची पारगाव मौला (ता. नगर) येथे गट क्र. 46 अ मध्ये वडिलोपार्जित सामायिक 5.40 हेक्टर शेत जमीन असुन सदर मिळकतीमध्ये 19 सदस्यांचे नावे आहेत. ती जमीन आजपावेतो एकत्रित असून तिचे कोणतेही वाटपत्र झालेले नाही. शेख यांच्या ओळखीचा मोहम्मद अरफत शौकत बागवान याने त्यांना तुमची एकत्रीत जमिनितला तुमचा हिस्सा तुमच्या नावावर करून देतो, असे म्हणुन विश्वासात घेतले. त्यानंतर तो शेख यांना वेळोवेळी भेटुन मी तुमचा वडिलोपार्जित हिस्सा नावावर करून देतो, असे सांगत असे. शेख यांनी त्याच्यावर विश्वास दाखविला.
बागवान याने शेख यांना जमिनीचे हिस्सा नावावर करण्याचे सांगुण 28 जुलै, 2022 रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात नेले. कार्यालयामध्ये शेख यांच्या सह्या व अंगठे देण्यास सांगितले. त्या प्रमाणे शेख यांनी सह्या व अंगठे दिले होते. त्यानंतर शेख यांनी बागवान याच्याकडे नावावर केलेला कागद (7/12 उतारा) ची वेळो वेळी मागणी केली असता त्याने कोणत्याही प्रकारे कागद दिलेला नाही.
त्यामुळे शेख यांनी त्यांचे नातेवाईक अफसर बादशहा शेख (रा. आशा टॉकीज चौक, नगर) यांना घडलेली हकीकत सांगुण बागवान हा नाव लागल्याचे कागद देत नाही, असे सांगितले. अरफत यांनाही बागवान याने उडवा उडवीचे उत्तर दिले. त्यानंतर बागवान याने दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदी दस्त क्र 4794/22 हा आणून दिला. सदरचा दस्त शेख यांनी नातेवाईक अफसर बादशहा शेख यांना दाखविला. यामध्ये असे लिखित होते की, पारगाव मौला गट क्र. 46 अ येथील 0.83 आर शेत जमीन खरेदी केल्याचे व सदरच्या जमिनीचा मोबादला सात लाख 70 हजार रूपये रोखीने दिले असल्याचे नमुद केलेले होते.
सदर खरेदी दस्त तयार करताना साक्षीदार म्हणून शमीन रफिक शेख व समरीन खलील शेख यांची नावे आहेत.
यामुळे मोहम्मद अरफत शौकत बागवान याने 28 जुलै, 2022 रोजी पारगाव मौला येथील गट नं. 46 अ या शेतजमिनीचे वडिलोपार्जित जमिनीवर नाव लावल्याचे ऐवजी खरेदी दस्त क्र. 4794/22 अन्वये मोहम्मद अरफत शौकत बागवान याने कोणत्याही प्रकारची रक्कम न देता त्याचे नावावर खरेदी करून बनावट दस्त तयार करून फसवणूक केली आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.