वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

भिंगारजवळील आलमगीर भागात थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाला वीजबिल धारकांकडून धक्काबुक्की करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एका जणावर भिंगार कँप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्तियाज अहमद अब्दुल गफुर रंगरेज (रा.आलमगीर, भिंगार) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, इम्तियाज अहमद अब्दुल गफुर रंगरेज यांच्या घराचे वीज बील थकलेले होते. त्यामुळे थकीत विजबील वसुलीसाठी महावितरणचे भिंगार कक्षाचे सहाय्यक अभियंता श्रीनिवास आवंडे विज कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन आलमगीर भागात गेले होते.
आरोपी रंगरेज यांनी विजबील भरले नसल्याने त्यांच्या घरातील विद्युतपुरवठा या पथकाने खंडित केला.याचा राग मनात धरुन रंगरेज याने तु माझी लाईट का कट केली, असे म्हणून धक्काबुक्की व शिवीगाळ करुन धमकी दिली असे अभियंता श्रीनिवास आवंडे यांनी भिंगार कँप पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.