Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह ! रोहित पवार यांची ८ तास ईडी चौकशी

ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह ! रोहित पवार यांची ८ तास ईडी चौकशी

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सुमारे ८ तास कसून चौकशी केली.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) कथित घोटाळ्यातील बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात ही चौकशी करण्यात आली.

मात्र, एकीकडे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला असताना ईडी या प्रकरणात चौकशी करत असल्याने ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आ. रोहित पवार यांच्याशी संबंधित बारामती अॅग्रो आणि अन्य कंपन्यांनी कथित एमएससी बँक घोटाळ्यात संशयास्पद व्यवहार करून तोट्यात गेलेली कन्नड एसएसके मिल हा कारखाना लिलावामध्ये ५० कोटींना विकत घेतला. त्यासाठीची रक्कम वेगवेगळ्या बँकांमधील खात्यांमधून खेळत्या भांडवल सुविधेतून घेतली गेली.

तसेच, कन्नड एसएसकेच्या लिलावात भाग घेतलेल्या बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन इंडिया लि. आणि समृद्धी शुगर प्रा. लि. या कंपन्यापैकी हायटेक इंजिनीअरिंगने बयाणा ठेव म्हणून दिलेले ५ कोटी बारामती अॅग्रोकडून घेतल्याच्या आरोपांवरून आ. रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.

ईडीने बारामती अॅग्रो कंपनीसह अन्य ५ कंपन्या, संबंधित व्यक्ती यांच्या मुंबई, पुणे, बारामती येथील सहा ठिकाणी ५ जानेवारीला छापेमारी केल्यानंतर आ. रोहित पवार यांना समन्स बजावून २४ जानेवारीला त्यांची सलग ११ तास कसून चौकशी केली होती.

आ. रोहित पवार यांना १ फेब्रुवारीला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार, गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास आ. रोहित पवार चौकशीसाठी ईडीच्या दक्षिण मुंबईतील बेलार्ड येथील कार्यालयात हजर झाले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (एमएससीबी) कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे मनी लॉण्डरिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. मात्र, ईडीकडून रोहित पवार यांची चौकशी सुरूच असल्याने एकाच प्रकरणात दोन तपास यंत्रणांच्या चौकशीची दिशा वेगळी असल्याने नेमका कोणाचा तपास योग्य, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments