अहमदनगर

जिल्ह्यात सर्व दूर पाऊस, पेरणीला वेग; एवढ्या हेक्टरवर झाल्या पेरण्या

अहमदनगर- जिल्ह्यात सर्व दूर पाऊस कोसळत आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पावसाच्या हजेरीमुळे खरिपाच्या पेरण्यांनी चांगलाच वेग धरला आहे.

जिल्ह्यात सोमवारअखेर 3 लाख 70 हेक्टवर खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या पोहल्या असून पेरण्याची टक्केवारी ही 64 टक्क्यांवर पोहचली आहे. पेरणाचा वेग असाच राहिल्यास येत्या आठ दिवसांत नियोजनानुसार शंभर टक्के पेरण्याचा अंदाज कृषी विभागाला आहे.

झालेल्या पेरणीत सर्वाधिक कपाशीची लागवड झाली असून कपाशीचे क्षेत्र हे 89 हजार तर सोयाबीनचे क्षेत्र हे 72 हजार 875 हेक्टरवर पोहचले आहे.

जिल्ह्यात 15 जूनपासून पेरण्यांना सुरूवात झाली. यात सुरूवातीला जिल्ह्याच्या दक्षिण भागात कडधान्य पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या. यात मूग, वटाणा, उडिद, तूर या पिकांचा समावेश आहे. मागील आठ दिवसांत अकोले भागात मोठ्या प्रमाणात मान्सूनचा पाऊस सक्रिय झाल्याने भात पिकाची खाचरे भरली आणि भात लागवडीला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत 17 हजार 276 सरासरी हेक्टरपैकी 1 हजार 748 हेक्टरवर भाताची लागवड झालेली आहे. त्याची टक्केवारी अवघी 10 टक्के आहे. याच सोबत 49 हजार हेक्टरवर बाजरी पिकाची पेरणी झालेली असून त्याची टक्केवारी 32 टक्के आहे. बाजार पिकाऐवजी यंदा शेतकर्‍यांनी सोयाबीनला पसंती दिल्याने यंदा सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे.

यासह चारा पिकांची 39 हजार हेक्टरवर पेरणी झाली असून कांदा लागवडीचे प्रमाण हे 3 हजार 200 हेक्टर आहे. भाजीपाला पिकांची आकडेवारी ही 10 हजार हेक्टरच्या जवळपास आहे. लवकरच श्रावण महिना सुरू होणार असून तेव्हापासून दिवाळीपर्यंत फुलांना मोठी मागणी असल्याने फुल शेतीची लागवड सुरू झाली आहे. 544 हेक्टरवर सध्या फुल शेती झालेली आहे. तर 4 हजार 773 हेक्टरवर फळबागांची लागवड झालेली आहे. पुढील आठवडाभर हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केलेला असल्याने यंदाचा खरीप शेतकर्‍यांसाठी चांगला ठरणार असल्याचे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button