राज ठाकरेंच नगर शहरात आगमन होताच भोंग्यावर वाजवली “हनुमान चालिसा”!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या होणाऱ्या सभेसाठी आज अहमदनगर मार्गे औरंगाबादला रवाना झाले. तत्पूर्वी अहमदनगरच्या माळीवाडा बस स्थानकासमोरील चौकात ठाकरेंचा ताफा आला त्यावेळी चौकातील खांबावरील भोंग्यावरून ‘हनुमान चालिसा’ वाजविण्यात आली.
राज ठाकरे चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील, असे कार्यकर्त्यांना वाटले होते. परंतु तसे झाले नाही. ठाकरे यांचा ताफा जेव्हा चौकात आला तेव्हा त्यांच्या वाहनाला कार्यकर्त्यांनी वेढा घातला. पोलिसांनी ठाकरे यांना वाहनाखाली न उतरण्याचा सल्ला दिला.
यावेळी कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे यांच्या वाहनाकडे धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. कार्यकर्त्यांची घोषणाबाजी वाढत होती. राज ठाकरे यांचा चालक वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करत होता. परंतु कार्यकर्ते वाहनासमोरून बाजूला हटले नाहीत.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून वाहनाच्या दरवाज्यातून बाहेर येत हात उंचावून जमावाला अभिवादन केले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. “जय श्रीराम”च्या घोषणा दिल्या. त्याचवेळी चौकात असलेल्या खांबावरील भोंग्यावरून “हनुमान चालिसा” वाजविण्यात आली. यानंतर राज ठाकरे तेथून पुढील प्रवासासाठी निघून गेले.