अहमदनगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातील खळबळजनक बातमी : आरोप राम शिंदेंचे… उत्तर विखे पाटलांचे ! वाचा काय काय घडलं ? कोण काय बोललं ???

Ram Shinde VS Vikhe Patil :- अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा भाजप नेते राम शिंदे आणि विखे पाटील पिता-पुत्रांमधला वाद समोर आला आहे. यावेळी वादाला निमित्त ठरलंय ती जामखेडची बाजार समिती निवडणूक.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी जामखेड बाजार समिती निवडणुकीत विरोधात काम केल्याचा आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी केला आहे. एवढंच नाही तर खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची छुपी युती असल्याचाही आरोप शिंदेंनी केला आहे.
जामखेड बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड आज झाली. त्यात ईश्वर चिठ्ठीने शिंदे गटाचे शरद कार्ले हे सभापती झाले. तर आमदार रोहित पवार यांच्या गटाचा ईश्वर चिठ्ठीने उपसभापती झाला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार राम शिंदे यांनी विखेंनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे.
विखे पाटलांचे स्पष्टीकरण
दरम्यान ह्या वादावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आमदार राम शिंदे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी गैरसमजुतीतून आरोप केले आहेत. वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याशी बोलणार आहे. त्यांचे थेट माध्यमांशी बोलणे उचित नाहीत. हा पक्षातंर्गत विषय आहे. तो पक्षातंर्गत सोडविला पाहिजे, असेही विखे यांनी म्हटले आहे. राम शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केल्यास आम्ही पक्ष नेतृत्वाला उत्तर देऊ, असे विखे म्हणाले.
राम शिंदे काय म्हणाले होते ?
भाजपने, आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनतीने ही निवडणूक लढली. आणि पवारांच्या विरोधात ही निवडणूक लढली. जिल्हा बँकेच्या संचालकाविरोधात लढली. आमच्याच पक्षाच्या खासदाराविरोधात लढली आणि लोकांनी आम्हाला कौल दिला. भाजपने आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, पालकमंत्री केलं आणि या राज्याच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचं स्थान म्हणजे महसूल मंत्रीही केलं. आणखी काय हवं आहे? असा प्रश्न उपस्थित होतो.
कार्यकर्त्याच्या निवडणुकीत नेतृत्वाने अशा प्रकारे व्यवहार करणं हे गैर आहे. मी हा विषय नेतृत्वाच्या आणि पक्षाच्या कानावर हा विषय घातलेला आहे. आणि पुन्हा एकदा माहिती देणार आहे. सातत्याने अशा प्रकारे कार्यकर्त्यांना अडचणी येत असतील तर हे गंभीर आहे. यामुळे भविष्यात पक्षाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. शेवटी एकदा कटुता निर्माण झाल्यानंतर ती वाढत जाते. भाजप हा पार्टी विथ द डिफरन्स आहे, काँग्रेस नाही. यामुळे भाजपमध्ये अशा वर्तनाला स्थान नाही, असं म्हणत राम शिंदे यांनी विखे पाटील यांना दिला आहे.
जामखेड मध्ये नक्की काय झाले ?
जामखेड बाजार समितीच्या १८ जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. त्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या निवडीकडे लक्ष लागले होते. कोणाचा सभापती होणार? याकडे लक्ष लागले होते.
पदाधिकाऱ्यांची आज निवड झाली. सभापतीपदी भाजपचे शरद कार्ले यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि त्यांची निवड घोषित करण्यात आली. तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे कैलास वराट यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि ते निवडले गेले.
समान मते मिळाल्याने लहान मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून निवड करण्यात आली. सभापतीपदाच्या निवडीत ईश्वरी चिठ्ठी टाकून हा कौल घेण्यात आला. अंकुश ढवळे आणि कैलास वराट हे दोन उमेदवार हे सुजय विखे यांचे उमेदवार असून ते बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या गटातून निवडणूक लढवून निवडून आले होते. त्यातील एक उमेदवार उपसभापती विराजमान झाला आहे.