‘त्या’ बहुचर्चित प्रकरणात राणे पिता-पुत्राला न्यायालयाकडून दिलासा

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात मंत्री नारायण राणे तसेच भाजप आमदार नितेश राणे यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
न्यायालयाने जामीन मंजूर करीत असताना काही अटी आणि शर्टी ठेवल्या असल्याचे नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच नितेश राणे यांनी न्यायालयाचे देखील आभार मानले आहेत.
लोकशाहीमध्ये आम्हा लोकप्रतिनिधींना जे काही अधिकार दिले आहेत. त्या अधिकारांचं आम्ही पालन करतो. कोणा विरोधात अन्याय होत असेल त्याला न्याय देण्याचं काम आम्ही करतो.
ते अधिकार न्यायालयाने कायम ठेवले त्यासाठी न्यायालयाचे मी आभार मानतो असं नितेश राणेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
नेमके प्रकरण काय आहे ?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी १९ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्या वेळी नितेश राणेही उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत दोघांनी दिशा सालियनच्या मृत्यूबाबत अनेक दावे केले होते.
त्यानंतर दिशाची आई वासंती यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीच्या आधारे मालवणी पोलिसांनी राणे पितापुत्रावर गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर अटकेच्या भीतीने राणे पितापुत्रांनी दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यााबबत कोर्टाने राणे पिता-पुत्रांचा अर्ज मान्य करत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.