रेशन घोटाळ्यातील आरोपींना दिलासा नाहीच… न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

पारनेर तालुक्यातील वडनेर येथील स्वस्त धान्य दुकानदार यांनी शासकीय धान्य वितरणात गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
दरम्यान या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी आरोपींना न्यायालयाने झटका दिला असून या आरोपींचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वडनेर येथील लोकजागृती सामजिक संस्थेचे कार्यकर्ते दत्तात्रय पवार यांनी येथील स्वस्त धान्य दुकानदार भागा खंडू बाबर यांच्यासह दोघांना काळ्याबाजारात रेशनचा गहू विकताना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पुढे या दुकानदाराने प्रशासकीय अधिकाऱ्यांची हातमिळवणी करून प्रकरण दडपले होते.
यावर पवार यांनी औरंगाबाद खंडपीठात आरोपीना सहकार्य करणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात मॅन्डॅमस याचिका दाखल केली होती. पुढे उच्च न्यायालयाने याप्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार भागा खंडू बाबर व चोरीचा माल विकत घेणारे भाऊसाहेब विठ्ठल गोरडे व रामदास मारुती कापसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
याबाबतची फिर्याद पारनेरचे पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिली. यातील आरोपींनी अटकपुर्व जामीन मिळण्यासाठी अहमदनगर सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
परंतु तो फेटाळण्यात आल्यानंतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. नुकताच न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे. त्यामुळे आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे.