अहमदनगर

खंडणी देण्यास नकार; व्यावसायिक युवकाला पाच जणांकडून मारहाण

पाच जणांच्या टोळक्याने एका व्यावसायिक युवकाला मारहाण केल्याची घटना बालिकाश्रम रोडवर घडली. भोजनालय चालविण्यासाठी महिन्याला दोन हजार रूपये खंडणी देण्यास नकार दिल्याने हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ओंकार महेश टाक (वय 21 रा. समता कॉलनी, विनायकनगर) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात भावड्या ऊर्फ ऋषिकेश दरंदले, रजनीश वाघ, टिंग्या साळवे व दोन अनोळखी विरूध्द दरोडा, खंडणी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकार टाक यांनी फिर्याद दिली आहे. ओंकार टाक हे बालिकाश्रम रोडवर सर्वस्व नावाचे भोजनालय चालवितात. ओंकार बालिकाश्रम रोडवर असताना दोन दुचाकींवरून पाच जण त्यांच्याकडे आले व म्हणाले,

‘तुला तुझे भोजनालय चालवायचे असेल तर तुला आम्हाला दर महिन्याला दोन हजार रूपये द्यावे लागतील’, ओंकारने पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने पाच जणांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

ओंकार यांच्या गळ्यातील 90 हजार रूपये किंमतीची दोन तोळ्याची चेन लंपास केली असून मोबाईल फोडून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button