रेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती

अहमदनगर- रेखा जरे खून खटल्यातील सर्व आरोपींविरूध्दची आरोप निश्चितीची प्रक्रिया प्रलंबित असून, त्यासाठी येत्या 15 डिसेंबरला जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे, अशी माहिती रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे यांच्यावतीने काम पाहणारे वकील अॅड.सचिन पटेकर यांनी दिली.
रेखा जरे यांचा खून खटला नगरच्या न्यायालयात न चालवता तो नाशिक वा ठाणे न्यायालयात चालवण्याची मागणी या प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे याचिकेद्वारे केली असून, त्यावर येत्या 16 डिसेंबरला दोन्ही बाजूंचे युक्तिवाद होणार आहेत.
30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची निर्घृण हत्या झाली आहे. या प्रकरणी 12 आरोपींविरुद्धचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाले असले तरी आरोप निश्चितीचीप्रक्रिया बाकी आहे.
ती येत्या 15 रोजी होणार्या सुनावणीच्या दिवशी होणे अपेक्षित आहे. दरम्यान, नगरच्या न्यायालयात सुरू असलेला जरे हत्याकांड खटला नाशिक वा ठाणे न्यायालयात वर्ग करण्याची मागणी आरोपी बोठे याने खंडपीठात याचिकेद्वारे केली आहे. त्यावर मागील 5 डिसेंबरला प्राथमिक सुनावणी झाली आहे. सरकार पक्षातर्फे म्हणणे मांडण्याची मुदत घेण्यात आली होती व त्यानुसार लेखी म्हणणे मांडले गेले आहे. आता येत्या 16 डिसेंबरला दोन्ही बाजूंचे युक्तिवाद खंडपीठासमोर होणार आहेत.