रेखा जरे हत्याकांड; अखेर 11 आरोपींविरूध्द…

अहमदनगर- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड खटल्यातील 12 पैकी 11 आरोपींवर अखेर आज शुक्रवारी न्यायालयात दोष निश्चिती करण्यात आली. हैद्राबाद येथील वकील जनार्दन अंकुला चंद्राअप्पा यांनी गैरहजर राहण्याचा अर्ज सादर केल्याने त्यांना शेवटची संधी देण्यात आली आहे.
30 नोव्हेंबर, 2020 रोजी रेखा जरे यांची हत्या झाली होती. या प्रकरणी 12 आरोपींविरूध्द सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 11 आरोपींविरूध्द दोष निश्चिती झाली आहे.
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. आरोपी ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य चोळके, ऋषिकेश पवार, फिरोज शेख, सागर भिंगारदिवे, बाळ बोठे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे हजर करण्यात आले होते. पी. अनंतलक्ष्मी, राजशेखर चकाली, इस्माईल शेख, अब्दुल रहेमान, महेश तनपुरे हे हजर होते.
जनार्दन अंकुला चंद्राअप्पा यांनी गैरहजर राहण्यासाठी विनंती अर्ज सादर केला होता. त्यांना गैरहजर राहण्यासाठी शेवटची संधी देत अर्ज मंजूर केला आहे. अन्य आरोपींचे निवेदन नोंदविण्यात आले आहे. मूळ फिर्यादीतर्फे अॅड. सचिन पटेकर यांनी काम पाहिले. अॅड. उमेशचंद्र यादव-पाटील हे विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत. आरोपींतर्फे अॅड. महेश तवले, अॅड. अमित झिंजुर्डे, अॅड. के. डी. तरकसे, अॅड. संजय दुशिंग, अॅड. अक्षय दांगट काम पाहत आहेत. येत्या 4 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.