रेखा जरे हत्याकांड; आरोपीची ‘ती’ मागणी फेटाळली

अहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याला पसार असतानाच्या काळात हैदराबाद येथे मदत करणारा वकील जनार्दन अकुला चंद्रप्पायाची कलम 212 नुसार दाखल गुन्ह्यातून वगळण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली व मंगळवारी (17 जानेवारी) त्याच्याविरुद्ध कलम 212 नुसार आरोप निश्चितीही केली गेली.
दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी आता येत्या सोमवारी (23 जानेवारी) होणार असून, त्यावेळी गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांद्वारे न्यायालयासमोर सादर होण्याची शक्यता आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात सहा मुख्य आरोपी आहेत. बाळ बोठेसह ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू शिंदे, आदित्य चोळके, फिरोज शेख, ऋषिकेश पवार व सागर भिंगारदिवे या सहा आरोपींविरुद्ध कलम 302 व 120 ब सह 34 नुसार आरोप निश्चिती झाली आहे.
तर शेख इस्माईल शेख अली, राजशेखर अजय चाकाली व अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ (सर्व रा.हैदराबाद, आंध्रप्रदेश) आणि नगरमधील महेश तनपुरे (रा. नवलेनगर, सावेडी) या चार जणांवर बोठेला पसार असतानाच्या काळात मदत केल्याने कलम 212 नुसार आरोप निश्चिती झाली आहे. या प्रकरणातील पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी ही महिला अजूनही पसार आहे. तर अॅड. जनार्दन अकुला चंद्रप्पा (रा.हैदराबाद) याने त्याच्यावरील कलम 212 नुसारच्या आरोप निश्चिती प्रक्रियेला आक्षेप घेतला होता.
बाळ बोठेशी काहीही संबंध नाही, तो ज्युनिअर शीपसाठी माझ्याकडे हैदराबादला आला होता, असे त्याचे म्हणणे होते. तर चंद्रप्पा व बोठे यांची आधीपासून ओळख होती व चंद्रप्पायाच्या सांगण्यावरूनच शेख इस्माईल, राजशेखर चकाली व अब्दुल रहेमान या आरोपींनी बोठेला मोबाईल व सीमकार्ड दिले होते, असा दावा या प्रकरणात रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे यांच्यावतीने काम पाहणारे वकील अॅड. सचिन पटेकर यांनी केला होता. या दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने चंद्रपा याचा अर्ज फेटाळला व त्याच्याविरुद्ध कलम 212 नुसार आरोप निश्चितीची प्रक्रियाही पूर्ण केली.
दरम्यान, या प्रकरणी येत्या सोमवारी (23 जानेवारी) सुनावणी होणार असून, जरे हत्याकांडाच्या गुन्ह्यात वापरलेली हत्यारे व अन्य मुद्देमाल पोलिसांद्वारे न्यायालयासमोर आणला जाणार असल्याचे सांगण्यात आले.