रेखा जरे हत्याकांड; ‘तो’ वकील म्हणतो, हत्याकांडाशी माझा काही संबंध नाही…

अहमदनगर- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील आरोपी जनार्दन अंकुला चंद्राप्पा याच्यावर आरोपी बाळ बोठे याला आश्रय दिल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यातून आपणास वगळावे असा युक्तिवाद जनार्दन चंद्रप्पा यांच्यावतीने शनिवारी न्यायालयात करण्यात आला. यावर 17 जानेवारी रोजी निर्णय दिला जाणार आहे.
अॅड.जनार्दन चंद्राप्पा यांच्यावतीने अॅड. महेश तवले यांनी युक्तिवाद केला. बोठे हे हैदराबादला न्यायालयामध्ये आपल्याकडे ज्युनिअर शिप करण्यासाठी आले होते. याबाबत न्यायालयातील रेकॉर्डही आपण नोंद केलेली आहे. बोठे याची त्या ठिकाणी आरोपी क्रमांक 9, 10 आणि 11 यांच्याशी ओळख झाली. त्यांनीच बोठे यांना मोबाईलचे सीमकार्ड उपलब्ध करून दिले आहे. बोठे हे हॉटेलमध्ये राहिलेले आहेत. या हत्याकांडाची आपल्याला माहिती नव्हती, असा बचाव जनार्धन चंद्रप्पा यांच्या वतीने करण्यात आला आहे.
मूळ फिर्यादी जरे यांच्या वतीने अॅड. सचिन पटेकर यांनी हे म्हणणे खोडून लावले. बोठे यांनी हैदराबाद येथे वकील व्यवसाय करण्यासाठी त्या राज्याच्या बार कौन्सिलकडे नोंदणी केलेली नाही. महाराष्ट्रातून थेट हैदराबादला एखादा कायद्याची पदवी घेणारा कसा येतोय, याला शंका घेण्यासाठी पुरेसे कारण आहे.
या घटनेची माहिती असूनही आश्रय दिला आहे. त्यामुळेच त्यांना मोबाईल सीमकार्ड उपलब्ध झाले आहे. चंद्रप्पा यांच्याकडे ज्युनिअर शिप करणारी वकील पी. लक्ष्मी ही का फरार आहे, असे मुद्दे उपस्थित करण्यात आले. चंद्रप्पा यांना या गुन्ह्यातून वगळू नये, असा युक्तिवाद पटेकर यांच्यावतीने करण्यात आला.