अहमदनगर

रेखा जरे हत्याकांड; आम्ही बोठेला मदत केली नाही; तीन आरोपींची…

अहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी बाळ बोठे पसार असताना आम्ही त्याला मदत केलेली नाही त्यामुळे आम्हाला गुन्ह्यातून वगळावे, अशी मागणी तिन आरोपींनी न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली आहे.

 

आरोपी शेख इस्माईल शेख अली, राजशेखर अजय चाकाली व अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ (तिघे रा. आंध्रप्रदेश) यांनी शुक्रवारी न्यायालयासमोर ही मागणी केली.

 

दरम्यान, या मागणीवर सरकार पक्षातर्फे युक्तिवाद बाकी असल्याने पुढील सुनावणी येत्या 28 सप्टेंबरला होणार आहे. त्याच दिवशी या प्रकरणातील सर्व 12 जणांची आरोपपत्र निश्‍चितीची प्रक्रियाही सुरू होणार आहे.

 

रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणी बोठेसह सहा प्रमुख आरोपी असून, अन्य सहा आरोपींवर पसार असतानाच्या काळात बोठेला मदत केल्याचा आरोप आहे व त्यांच्याविरूध्द कलम 212 नुसार कारवाई केली गेली आहे.

 

या मदत करणार्‍या सहा आरोपींपैकी शेख इस्माईल शेख अली, राजशेखर अजय चाकाली व अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ या तिघांनी न्यायालयासमोर शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी अर्ज करून पोलिसांनी कलम 212 नुसार केलेल्या कारवाईतून आम्हाला वगळावे, अशी मागणी केली. या प्रकरणाची सुनावणी येत्या 28 सप्टेंबरला ठेवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button