अहमदनगर

शेतकर्‍यांमध्ये संताप; दोन महिने उलटूनही अतिवृष्टी भरपाई मिळेना

अहमदनगर- सप्टेंबर महिन्याच्या पावसाने काही ठिकाणी पिकासह जमिनी वाहून गेल्या. सोयाबीन, कपाशी, मका,बाजरी आदींसह चारा पिके शेतात सडली गेली. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.

 

दरम्यान अतिवृष्टी झालेल्या घटनेला दोन महिने उलटून गेले मात्र अद्याप पर्यंत शेतकर्‍यांच्या हातात ना पीकविमा ना शासकीय नुकसान भरपाई. त्यामुळे शेतकरीबांधव अस्वस्थ झाले असून रब्बी हंगामाला कसे सामोरे जायचे हा मोठा प्रश्न त्यांंना पडला आहे.

 

शेतकर्‍यांना जास्तीतजास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी दोन हेक्टर वरून तीन हेक्टरची मर्यादा व नुकसान भरपाईची रक्कम वाढविली असल्याचे जाहीरपणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गावातील तलाठ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले.

 

शेतात जाऊन प्रत्यक्ष नुकसान भरपाईचे पंचनामे केले. पंचनाम्यासाठी पैसे मागितले म्हणून काही तलाठी, ग्रामसेवक यांना बडतर्फ करण्यात आले. ऑनलाईन पीक पाहाणी होत नसल्याने ही अट पण शिथील करण्यात आली. आमदार, मंत्री, शासकीय अधिकारी यांनी पाहणी दौरा काढून हवाई व जमिनीवरून पाहणी केली. आणि सरकारी घोषणांचा पाऊस सुरू झाला. शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. लवकरात लवकर पिकविमा व नुकसान भरपाईची जास्तीत जास्त रक्कम देऊन त्याची दिवाळी गोड करु. हे शेतकर्‍यांचे सरकार आहे.

 

अशा घोषणांचा पाऊस पडला. मात्र दिवाळी होऊन महिना उलटला तरी शेतकर्‍यांना मात्र एक छदाम देखील मिळाला नाही. अतिवृष्टीमुळे सोयाबीन गेली.कपाशीची बोंडे काळी पडली. खालची बोंडं वाहून गेली. नविन लागलेलं पात ही पावसाने गळून गेलं. दहा पोत्यावरून सोयाबीन दोन अनं तीन पोत्यावर आलं. दहा क्विंटल वरून कपाशी तीन-चार क्विंटलवर आली. कांद्याची रोपे वाहून गेली.

 

पाणी साचल्याने काही सडून गेली. यामुळे उत्पन्नात जबर फटका बसला.झालेला खर्च देखील निघाला नाही. उलट शेतातून पीक बाहेर काढण्यासाठी जादा पैसे मोजावे लागले. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. हे भयानक वास्तव आहे. तरी देखील शेतकरी रब्बी हंगामाला सामोरे जाण्याची तयारी करतोय.

 

गहू, हरभरा, कांदा, चारा पिके आदींसाठी रानं तयार करतोय. कुटुंबा समवेत रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करत आहे. परंतु त्याच्या खिशात छदामही नसल्याने तो रोज शासकीय मदतीची आशाळभूतपणे वाट पाहत आहे. कधी सरकारला आपली दया येईल व कधी नुकसान भरपाई आपल्याला भेटेल या कडे आता सर्व शेतकरी बांधवांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र फोडाफोडीचे राजकारण व निवडणुकांचे राजकारण यातून बाहेर पडण्यास व शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला सरकारला वेळच दिसत नाही? खरंच हे माझं सरकार आहे का? असे म्हणण्याची वेळ शेतकरीबांधवांवर आली आहे.

 

बळीराजा आता मेटाकुटीला आला असून आस्मानी व सुलतानी दोन्ही संकटाने त्याचे कंबरडे मोडले कांदा, सोयाबिन व कपाशीचे भाव गडगडल्याने तो पुरता हतबल झाला आहे. यातून त्याला बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने पिकाची नुकसानभारपाई व विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button