अहमदनगर

दरोडा टाकून केली मारहाण; पोलिसांनी दोघांना केले गजाआड

अहमदनगर- धोत्रे (ता. पारनेर) येथे दरोडा टाकणार्‍या प्रदीप ऊर्फ खुटल्या आरकस काळे (वय 20) व निमकर अर्जुन काळे (वय 21, दोघे रा. रांजणगाव मशिद, ता. पारनेर) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

 

सावळेराव देवराम भांड (वय 24, रा. धोत्रे बुद्रुक) हे कुटूंबासह घरामध्ये झोपलेले असतांना अंदाजे 25-30 वयाचे 5 ते 6 दरोडेखोरांनी घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. सावळेराव व त्यांची पत्नी यांना कोयता व चाकूचा धाक दाखवून मारहाण करून घरातील सोन्याचे दागिने चोरी केले.

 

तसेच त्यांचे शेजारी राहणारे विठ्ठल बबन भांडे यांना कोयता व चाकूचा धाक दाखवून मारहाण व जखमी करून सोन्या- चांदीचे दागिने असा एक लाख 40 हजार रूपयांचा ऐवज लुटला पळुन गेले. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्ह्याचे गांर्भीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक निरीक्षक दिनकर मुंडे, अंमलदार भाऊसाहेब काळे, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, दीपक शिंदे, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, रोहित येमूल, विजय धनेधर, बबन बेरड यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा रांजणगाव मशिद येथील आरोपी प्रदीप काळे व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची माहिती मिळाली.

 

त्यानुसार प्रदीप ऊर्फ खुटल्या आरकस काळे व निमकर अर्जुन काळे या दोघांकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता सुरूवातीस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे इतर साथीदारांसह केल्याची कबुली दिलेली आहे. दोघांनी ही श्रीगोंदे, बेलवंडी, पारनेर, सुपा, रांजणगाव एमआयडीसी (पुणे), नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडे, जबरी चोर्‍या, चोरी असे गंभीर गुन्हे केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button