अहमदनगर

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून दरोडा; साडेतीन लाखांचा ऐवज लुटला

अहमदनगर- दारू पिण्यासाठी पाच हजार रुपये दिले नाही म्हणून तिघांंना मारहाण करत कत्तीचा धाक दाखवून 3 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज लुटला. अशोकनगर (ता. श्रीरामपूर) येथील रेल्वे चौकी नंबर 1, भुयारी मार्गाकडे जाणार्‍या रोडजवळ ही घटना घडली. याप्रकरणी श्रीरामपूरमधील आठ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

फिर्यादी किसन झुंबरराव आव्हाड (वय 44) रा. दापूर, ता. सिन्नर व त्यांचे मित्र योगेश दादा लोंढे हे दोघे महिंद्रा एक्सयुव्ही गाडी घेऊन श्रीरामपूर येथे अण्णासाहेब रंगनाथ इंगळे यांचेकडे रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आले होते. अण्णासाहेब इंगळे यांच्याबरोबर श्रीरामपूर येथील त्याचा मित्र शोयब इसाक शेख हाही होता.

 

या सर्वांच्या गप्पागोष्टी झालेनंतर सर्वांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर किसन आव्हाड व त्याचे मित्र रेल्वे चौकी नंबर 1 अशोकनगर भुयारी मार्गाकडे जाणारे रोडजवळ थांबले असतांना रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तेथे दोन ते तीन मोटार सायकलवर पाच ते सात इसम आले. ते शोएब शेख याचे ओळखीचे असल्याने ते त्यांना म्हणाले, आम्हाला जेवण करायचे असून दारु पिण्यासाठी 5 हजार रुपये दे.

 

त्यावेळी ते त्यांना आमचेकडे दारु पिण्यासाठी पैसे नाही असे म्हणाले असता त्याचा राग येवून त्यांनी फिर्यादी व त्यांच्या साथीदारांना शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यांना आव्हाड व त्याचे मित्र म्हणाले तुम्ही शिवीगाळ करू नका, जावू द्या असे म्हणत असताना त्यांच्या मधील एकाने कमरेस असलेले लोखंडी कत्ती काढून दमदाटी करु लागले व इतरांनीही लोखंडी रॉडने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यापैकी एकाने आव्हाड याच्या गळ्यास कत्ती लावून त्याचे 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 2 लाख 40 हजार रुपये, एक ओप्पो कंपनीचा मोबाईल, खिशातील 80 हजार रुपये रोख, मित्र योगेश दादा लोंढे याचे खिशातील 20 हजार रुपये, मित्र आण्णासाहेब रंगनाथ इंगळे यांचे खिशातील 30 हजार रुपये रोख रक्कम, मित्र शोयेब इसाक शेख याचे खिशातील 53 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज घेवून सर्व आरोपी निघून गेले.

 

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात किसन झुंबरराव आव्हाड यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सलिम पठाण, अरबाज पठाण दोघे रा. नवी दिल्ली झोपडपट्टी वॉर्ड नं 2 श्रीरामपूर तसेच शरीफ कटर, अमोल (पुर्ण नाव पत्ता माहित नाही), आकाश साबळे, सोनू साबळे दोघे रा. कांदा मार्केट वॉर्ड नं 6 श्रीरामपूर, तसेच अन्य दोघे अशा आठ जणांविरोधात गुन्हा रजि. नं. 126/2023, भादंवि कलम 395 अन्वये गुन्हा दाखल केला आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button