एस. टी.चालकास मारहाण करणे भोवले; न्यायालयाने चौघांना दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर- श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ला यांनी एस.टी. चालकास मारहाण करणार्या चौघांना दोन वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली.
सचिन दिलीप पवार (वय 25), राहुल चंद्रकांत गाडे (वय 24), हुसेन इब्राहिम मुलाणी (वय 24), अभिजित तान्हाजी जगदाळे (वय 22, सर्व रा. भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
चालक हनुमंत कदम हे जामखेड आगाराची एस.टी.बस घेऊन 27 जून 2018 रोजी जामखेडवरून कर्जतकडे येत होते. माहीजळगाव (ता. कर्जत) शिवारात दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास समोरून स्वीप्ट कार आली. चालकाने कार रस्त्याच्या मधोमध उभी केली. बस चालकाने त्यास कार थोडी बाजूला घे असे म्हणाले असता, कारमधील चौघांनी चालक कदम यांना खाली ओढून मारहाण केली. त्यातील एका आरोपीने त्यांच्या नाकावर मारून गंभीर जखमी केले. कार घेऊन निघून गेले.
कदम यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक एस. डी. पालवे यांनी गुन्ह्याचा तपास करून चारही आरोपींना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात फिर्यादी, तपासी अधिकारी, डॉक्टर व पंच यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी आशा खामकर यांनी सहकार्य केले.