अहमदनगर

सैराट: भावाने केली बहिणीच्या प्रियकराची हत्या

अहमदनगर- प्रेम प्रकरणातून पळून गेलेल्या बहिणीच्या प्रियकराची भावाने हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणामुळे सैराट चित्रपटाच्या कथानकाला उजळणी मिळाली. औरंगाबाद जिल्ह्यातील इसारवाडी फाटा परीसरात बहिणीच्या प्रियकराचा खून करुन पळून जात असलेल्या आरोपीस अवघ्या चार तासांत श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ते खोकर फाटा दरम्यान तालुका पोलिसांनी जेरबंद करून वाळूंज (जि. औरंगाबाद) पोलिसांच्या ताब्यात दिलेे आहे.

 

भोकर येथून काही वर्षापूर्वी गावातच राहणारा बाबासाहेब छबुराव खिलारी याने गावातीलच एका मुलीस फुस लावून पळवून नेल्याची चर्चा काही दिवस चालली. नंतर त्यावर विरजन पडले. परंतु काल गुरूवार दि.29 डिसेंबर रोजी दुपारी गावातील तरुणीला पळवून नेणार्‍या बाबासाहेब खिलारी यांची औरंगाबाद जिल्ह्यातील विसारवाडी फाटा परिसरात हत्या झाल्याची वार्ता गावात पोहचली. ही हत्या त्याने पळवून नेलेल्या तरुणीच्या भावाने केला असून तो श्रीरामपूरकडे आला व तालुका पोलिसात हजर झाल्याची चर्चा गावात सुरू होती.

 

अखेर रात्री उशिराने तालुका पोलिसांनी औरंगाबाद येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अवघ्या चार तासांत जेरबंद केल्याची माहिती एका प्रेसनोटद्वारे दिली. त्यात म्हटले आहे की, श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांना औरंगाबाद शहर हद्दीतील वाळूंज पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं.401/2022, भादंवि कलम 302 मधील आरोपी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे हद्दीत पळाल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांकडून कळविण्यात आली.

 

त्यानुसार सहाययक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक खोकरकडे रवाना केले. या पथकाने भोकर शिवारातील खोकर फाटा परिसरात आरोपी त्याच्याजवळील स्पेंडर मोटारसायकल (क्रं.एमएच 15 एएन 6285) वरुन येत असताना दिसला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने मोटारसायकल रस्त्यावर टाकून शेजारच्या ऊसाच्या शेतात पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यास जेरबंद केले.

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, उपनिरीक्षक संजय निकम, अतुल बोरसे, सहाय्यक फौजदार हबीब अली, पो.नाईक अनिल शेगाळे, प्रशांत रन्नवरे, पो.कॉ. संदीप पवार यांनी ही कामगीरी बजावली. आरोपीस वाळूंज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास पो.नि. सचीन इंगोळे हे करीत आहेत.

 

दरम्यान या घटनेमुळे सैराट चित्रपटाच्या कथानकाला उजाळा मिळाल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भोकर गाव पुन्हा चर्चेत आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button