अहमदनगर

कुक्कुटपालनासाठी आणलेल्या पिल्लांची विक्री; कंपनीला 54 लाखांना ‘असा’ घातला गंडा

कुक्कुटपालनासाठी शेतकर्‍यांनी कंपनीकडून आणलेल्या सुमारे साडेसोळा हजार पिल्लांची विक्री केली. यामध्ये कंपनीच्या कर्मचार्‍यांचीही हातमिळवणी असल्याचे समोर आले आहे.

अलिबाग (जि. रायगड) येथील प्रिमीयम चीक फिड्स कंपनीची 54 लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दीपक भोर, शिवाजी गायकवाड (शाखा व्यवस्थापक), रोहन धांडे (लेखनिक), कृष्णा शिंदे (मार्केटिंग सहायक), रोहित शिंदे (लेखनिक सहायक), महेश भोर, सौरभ कापसे, अनिल मारूती गुंजाळ (पोल्ट्री फार्म मालक, रा. निमगाव वाघा ता. नगर), सुहास किसान महांडुळे (पोल्ट्री फार्म मालक, रा. भोरवाडी ता. नगर), रघुनाथ हरी भोर (पोल्ट्री फार्म मालक, रा. भोरवाडी, ता. नगर) यांच्याविरूध्द नगर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीचे लेखापरीक्षक संदेश हिराचंद दांडेकर (रा. मेढेखार ता. अलिबाग, जि. रायगड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. कंपनीची नगरमध्ये केडगाव येथे शाखा आहे.

कंपनी परिसरातील पोल्ट्री चालक शेतकर्‍यांशी करार करून त्यांना बॉयलर कोंबड्यांची पिल्ले, खाद्य आणि औषधे देते. शेतकरी ती पिल्ले वाढवतात व त्या मोबदल्यात त्यांना पिल्लांच्या वजनावरून पैसे दिले जातात.

या व्यवसायबाबत संबंधितांशी करार केले जातात. केडगाव शाखेकडुन अनिल गुंजाळ, सुहास महांडुळे, रघुनाथ भोर या शेतकर्‍यास दिलेले पक्षी व खाद्य शेतकर्‍यांनी परस्पर विकलेले असल्याचे केडगाव येथील शाखा व्यवस्थापक शिवाजी विश्वनाथ गायकवाड यांनी कंपनीचे मालक शाम भालचंद्र ढवण यांना कळविले.

त्यानंतर ढवण यांनी दांडेकर यांना शाखेचे लेखा परिक्षण करण्यास व कर्मचार्‍यांचेकडे चौकशी करण्यास सांगितले8 एप्रिल रोजी दांडेकर व लेखा परीक्षक राजेश रमेश गुरव यांनी केडगाव शाखेचे लेखा परीक्षण केले.

शाखेतील कर्मचार्‍यांचेकडे चौकशी केली. यात अनिल गुंजाळ, सुहास महांडुळे, रघुनाथ भोर, अर्जुन भोर या चार शेतकर्‍यांशी केलेल्या करार पत्राच्या मूळ प्रती शाखेत मिळाल्या नाहीत.

शेतकर्‍यांचे फार्मवर देखरेख करण्याचे काम प्रदीप बबन खेडकर या लाईन सुपरवायझरकडे होते. त्याच्या फार्म बुक व इतर रेकॉर्ड वरून शेतकर्‍यांकडे असलेले पक्षी व खाद्य हे त्यांनी विकले असल्याचे समोर आले. यातून कंपनीची 54 लाख 18 हजार 438 रुपयांची फसवणूक झाली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button