‘क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टीम’ घेणार नगर जिल्ह्यातील गुन्हेगारांचा शोध

अहमदनगर- गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. ‘क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टीम’ या संगणक प्रणालीचा वापर केला जाणार आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शेखर मंगळवारपासून नगरच्या दौर्यावर आहेत. त्यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी उपस्थित होते.
डॉ. शेखर म्हणाले,‘गुन्हेगारांच्या शोधासाठी, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे पाच जिल्ह्यात ‘क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टीम’ या संगणकीय प्रणालीचा वापर केला जाणार आहे. गुगलचा वापर करून या संगणक प्रणालीव्दारे गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्याचे प्रोफाइल तयार करणे, गुन्हेगारावर कोण पोलीस कर्मचारी, केव्हापासून लक्ष ठेवून आहे, पोलीस कर्मचार्याने संबंधित गुन्हेगाराची पडताळणी केंव्हा केली याची सर्व अद्ययावत माहिती या अॅपव्दारे वरिष्ठ अधिकार्यांना मिळणार आहे.
पोलिसांनी मूलभूत कामाकडे (बेसिक पोलिसींग) लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गुन्हेगाराचे ‘हिस्टरी शीट’ तयार करायला हवे. शोध व जनसंपर्क यावर भर देण्याची आवश्यकता आहे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ होत असली तरी आरोपींचे शोध लागण्याचे, फसवणूक झालेल्यांना पैसे मिळवून परत मिळवून देण्यातही पोलिसांना यश मिळत आहे. परंतु बहुतांशी आरोपी परराज्यातील असल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडचणी जाणवतात असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यासाठी आणखी 500 पोलीस कर्मचार्यांची आवश्यकता आहे, तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
नगर शहरामध्ये उड्डाणपूल झाला, मात्र त्यावर अपघात वाढले असल्याची दखल घेत उड्डाणपूलावरून धावणार्या वाहनांसाठी वेग मर्यादा लागू केली जाणार असल्याचे सांगितले. प्रति तास 50 किमीपेक्षा अधिक वेगाने धावणार्या वाहनांवर कारवाई केली जाईल, त्यासाठी स्पीडगन, कर्मचारी नियुक्त आदी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच जिल्ह्यात रस्ते अपघाताच्या दृष्टीने ‘ब्लॅकस्पॉट’ निश्चित करण्यात आले होते. त्यामध्ये रस्त्याच्या परिस्थितीत सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी ही संख्या 56 होती, ती आता 27 पर्यंत खाली आणली आहे. यासाठी वाहतूक निरीक्षक व उपअधीक्षकांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. रस्त्याची परिस्थिती सुधारली आहे की नाही यासाठी पूर्वीचे व उपाययोजना केल्यानंतरचे छायाचित्र मागवून घेतले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील महिनाभरात विविध विषयांवर लक्ष केंद्रित करून शोध मोहिमा राबवण्याचे आदेशही त्यांनी जिल्हा पोलीस दलास दिले आहेत. मादक पदार्थ विक्री, गावठी कट्टे, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे, यासाठी आगामी एक महिन्यात मोहीम राबवण्याची आदेश त्यांनी दिले आहेत. गावठी कट्टा बाळगणार्याला पकडले तर ती संबंधित कर्मचार्यांची केवळ कामगिरी समजली जाईल, परंतु त्याला विकणार्याला पकडले तर 500 रूपयांचे बक्षीस व गावठी कट्टा कोठून आणला त्या मालकाला पकडले तर 5 हजारांचे बक्षीस दिले जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. नाशिक विभागातील पाच जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 262 गावठी कट्टे व 413 काडतुसे, 445 तलवारी आदी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. एकूण 346 आरोपींना पकडण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक विभागात 166 गुन्हेगारांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली. त्यातील सर्वाधिक कारवाई नगर जिल्ह्यातील 121 गुन्हेगारांवर करण्यात आली आहे. तसेच नाशिक विभागातील पाच जिल्ह्यातून आठ हजार 200 आरोपी फरार आहेत. त्यातील चार हजार 682 नगर जिल्ह्यातील आहेत. फरार आरोपी पकडण्यात नगर जिल्हा आघाडीवर आहे. आत्तापर्यंत एक हजार 593 आरोपी पकडले गेले. जळगाव मध्ये 215, नाशिक 85, धुळे 82, नंदुरबार 46 असे एकूण दोन हजार 21 आरोपी पकडले गेले आहेत.