विद्युत रोहित्राचे उघडे व धोकादायक बॉक्सवर झाकणे बसवून ती सुरक्षित करावीत

लवकरच सुरु होत असलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने ग्रामीण भागातील गावठाणा शेजारी असणाऱ्या विद्युत रोहित्राचे उघडे व धोकादायक बॉक्सवर झाकणे बसवून ती सुरक्षित करावीत. अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
गावठाण डीपी बॉक्स बहुतांशी ठिकाणी रस्त्याच्या कडेला व वर्दळीच्या ठिकाणी असून लहान मुले, प्रवासी, जनावरे तसेच मानवाच्या जीवीतास त्यामुळे धोका संभवतो. त्यापूर्वीच त्याबाबत खबरदारी घेतल्यास पुढील नुकसान टळणार आहे.
अनेक डीपी बॉक्स हे जुने झाल्याने ते खराब झाले असून, बॉक्सची झाकणे तुटल्याने ती उघडीच आहेत. पावसाळ्यात पोलवर लोंबणाऱ्या तारा, झाडांच्या फांद्यांना चिकटलेल्या वीज तारा, उघडी व धोकादायक तसेच अपघाताला आमंत्रण देणारी रोहित्रे, यांना वादळी पावसात मोठा धोका होऊ शकतो व त्यानंतर खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यास अर्पुया कर्मचारी वर्गामुळे व पावसाळी वातावरणामुळे अडचणी निर्माण होतात.
परंतु पावसाळ्यापूर्वीच योग्य उपाय योजना केल्यास महावितरणला सोयीचे होणार आहे. अनेकवेळा नैसर्गीक अडचणीमुळे विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यास दुरुस्तीच्या कामाला विलंब होतो व रात्रभर गावे अंधारात राहतात.
वीज नसल्याने पाणी पुरवठ्यासह अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. त्यासाठी वीज वितरण कंपनीने या समस्यांबाबत पावसाळ्यापूर्वीच दक्षता घेण्याची मागणी केली जात आहे.