अहमदनगर

मुकादमाकडील साडेसात लाख लुटले; पोलिसांनी १७ लाखांच्या मुद्देमालासह चौघे गजाआड केले

अहमदनगर- ऊस तोड मुकादम मजुरीची रोख रक्कम दुचाकीवरून घरी घेऊन जात असताना रात्रीचे वेळी करंजी घाटात (ता. पाथर्डी) वाहन आडवून सात लाख 70 हजार रूपये रोख रक्कम लुटण्यात आली होती. ही रक्कम लुटणार्‍या चौघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

 

प्रवीण ऊर्फ पप्पु दिलीप दराडे (वय 32), अंबादास नारायण नागरे (वय 31, दोघे रा. पागोरी पिंपळगाव ता. पाथर्डी), तात्याबा पोपट दहिफळे (वय 33 रा. महिंदा, ता. आष्टी, जि. बीड), दत्तू बाबादेव सातपुते (वय 34 रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी) अशी जेरबंद केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात लुटलेले पाच लाख रूपये तसेच स्कॉर्पिओ, चार मोबाईल असा एकूण 17 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

ऊसतोड मुकादम संतोष शहादेव बर्डे (वय 36 रा. भिलवडे ता. पाथर्डी) हे त्यांचे भाऊ बबन बर्डे असे दोघे 28 जून 2022 रोजी संत तुकाराम साखर कारखाना येथुन त्यांचे कामाचे पाच लाख 70 हजार रूपये रोख व अजिनाथ कारभारी मिसाळ यांचे कामाचे दोन लाख रूपये रोख असे एकूण सात लाख 70 हजार रूपये रोख रक्कम दुचाकीवर घेऊन घरी येत होते. करंजी घाट येथे दर्ग्याजवळ त्यांच्या पाठीमागून एक स्कॉर्पिओ आली. दुचाकीला कट मारून स्कॉर्पिओ आडवी लावून वाहनातील तिघांनी मारहाण करून, धाक दाखवून दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेली वरील रोख रक्कम लुटली होती. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदरचा गुन्हा हा पप्पु दराडे याने केला असून, तो पागोरी पिंपळगाव येथे त्याचे राहते घरी आलेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पागोरी पिंपळगाव येथे जाऊन शिताफीने प्रवीण दराडे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा अंबादास नागरे, तात्याबा दहिफळे, दत्तू सातपुते यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात लुटलेले पाच लाख रूपये तसेच स्कॉर्पिओ, चार मोबाईल असा एकूण 17 लाख 40 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल काढून दिला.

 

दरम्यान प्रवीण दराडे हा सहकार्यांसह संत तुकाराम साखर कारखाना येथे कारखान्याचा ऊस वाहतूक करार करण्यासाठी गेला होता. तेथून त्याने आजिनाथ मिसाळ यांच्यावर पाळत ठेवली होती. साथीदारासह त्यांचा मुळशी येथून करंजीघाटापर्यंत पाठलाग करत स्कॉर्पिओ गाडी दुचाकीला आडवी लावून रोख रक्कम लुटल्याची कबूली त्याने दिली आहे.

 

पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार मनोहर शेजवळ, संदीप पवार, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, संतोष लोढे, शंकर चौधरी, संदीप चव्हाण, दीपक शिंदे, विश्वास बेरड, योगेश सातपुते, सागर ससाणे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button