सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पाच मुलींची सुटका, दोघे अटकेत

अहमदनगर- हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून पाच परप्रांतीय मुलींची सुटका केली. नेवासा फाटा परिसरातील हॉटेल औदुंबर व हॉटेल नामगंगा येथे ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. शुक्रवार दि. 25 नोव्हेंबर रोजी नेवासा फाटा परिसरात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे याबाबत गुप्त बातमी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना मिळाली. त्यावरून नेवासा फाटा परिसरात हॉटेल औदुंबर व हॉटेल नामगंगा या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. यावेळी या हॉटेलांतून पाच पीडित परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे.
विक्रम बाळासाहेब साठे (वय 20) रा. जालना व अमोल नामदेव पैठणे (वय 25) रा. मुकिंदपूर ता. नेवासा यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम 3, 4, 5, 7, 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला. या कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरात व शहरातील अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले आहे.
एक-दीड महिन्यापूर्वीही नेवासाफाटा परिसरातील हॉटेलांमध्ये छापा टाकून अवैध देहविक्री व्यवसायातील मुलींची सुटका करुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरीदेखील असे उद्योग अद्यापही सुरु असल्याचे या छाप्यातून स्पष्ट झाले. दरम्यान या प्रकरणी अटक केलेल्या दोघांना पोलिसांनी नेवासा न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक़ प्रताप दराडे, पोलीस निरीक्षक करे, सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक श्री. थोरात, उपनिरीक्षक श्री. मोंढे, सहायक फौजदार राजेंद्र आरोळे, हवालदार श्री. औटी, पोलीस कॉन्स्टेबल वसीम इनामदार, श्री. पाखरे, विकास साळवे, सुहास गायकवाड, श्री. ठोंबरे, कुदळे, गुंजाळ, करंजकर, इनामदार, महिला पोलीस श्रीमती उंदरे व महिला पोलीस श्रीमती जाधव यांनी केली.