नामांकित विद्यालयातील कर्मचार्याकडून अल्पवयीन मुलीचा लैगिंक छळ; न्यायालयाने…

अहमदनगर – अहमदनगर शहरातील एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेणार्या अल्पवयीन मुलीचा तेथील कर्मचारी आत्माराम बापुराव लगड (वय 58 रा. आठवड ता. नगर) याने लैगिंक छळ केला होता. याप्रकरणी त्याला न्यायालयाने दोषी धरून बालकांचे संरक्षण करणारा कायदा 2012 चे कलम 10 प्रमाणे पाच वर्षे सक्त मजुरी व एक हजार रूपये दंड तसेच कलम 12 प्रमाणे सहा महिने सक्तमजुरी, पाच हजार रूपये दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
न्यायालयाने सरकारी पक्षाच्यावतीने नोंदविलेला भक्कम पुरावा व युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी आत्माराम लगड यास शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम.ए.बरालीया यांनी हा निकाल दिला. सदर खटल्याचे कामकाज अति.सरकारी वकील अॅड.सी.डी.कुलकर्णी यांनी पाहिले.
सदर घटनेतील अल्पवयीन मुलगी ही अहमदनगर येथील एका नामांकित विद्यालयामध्ये सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती व ती नियमीतपणे शाळेत जात होती. ती 2 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास व 4 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शाळेत गेली असता, तेथील कर्मचारी लगड याने तिचा लैगिंक छळ केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लगडविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.