शरद पवार म्हणाले नीलेश लंकेंच्या नावाची राज्याला…

आमदार नीलेश लंके यांनी कोरोनासारख्या संकट काळात केलेल्या कामामुळे पारनेरचे नव्हे, तर राज्याचे नाव मोठे केले आहे. त्यामुळे आता आमची अडचण झाली आहे.
मी राज्यात जेथे-जेथे कार्यक्रमांसाठी जातो, तेथे-तेथे लोक म्हणतात, की साहेब, तुमचा कार्यक्रम खूप चांगला झाला;
पण पुढच्या वेळी आमदार नीलेश लंके यांना घेऊन या किंवा आमच्याकडे त्यांना पाठवा. राज्यभरातील लोकांना लंके कोण आहेत, हे पाहण्याची उत्सुकता लागली आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काढले.
पवार गुरुवारी हंगे येथे आमदार लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी बोलत होते. या वेळी हंगे परिसरातील सुमारे १२ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजनही पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी माजी आमदार दादा कळमकर, आमदार नीलेश लंके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, मंजूषा गुंड, महेबूब शेख, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड, सुदाम पवार, नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, की आमदार लंके यांच्या कोरोना काळातील कामाची दखल देशभरात घेतली गेली. त्यामुळे लोकांमध्ये त्यांचे नाव खूप मोठे झाले आहे. त्यांनी फक्त गोडधोड जेवण घालून वाढदिवस साजरा नाही केला,
तर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून अनेकांचे संसार सुखी केले आहेत. अशी चांगली कामे करणाऱ्या लंके यांचा कार्यक्रम चुकवायचा नाही, अशी आमची भूमिका आहे, असेही या वेळी पवार म्हणाले.