दोनच कुटंबांना निवारा; २० कुटुंबे उघड्यावरच… मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच प्रशासन सुस्त

वनकुटयात प्रथमच मुख्यमंत्री आले, त्यांनी नुकसान झालेल्या शेतकरी व आपत्तीग्रस्तांच्या घरांची व शेतीमालाची पाहणी केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून दोन दिवस झाले तरी आपत्तीग्रस्तांच्या हाती विशेष काही लागले नसल्याची भावना वनकुटेकरांमध्ये आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या दोन घरांची पाहणी केली वा दोन कुटुंबांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली त्यांच्या निवाऱ्याचे काम युध्दपातळीवर सुरू झाले. परंतू इतर वीस कुटुंबे आजही मदतीसाठी प्रतीक्षेत आहेत.
गारपीट व अवकाळी पावसाने बाधित झालेल्या सर्व नागरिकांना दोन दिवसांत सर्वांना निवारा द्या, अशी घोषणा मुख्यमंत्री करून गेले, प्रत्यक्षात प्रशासन मात्र त्यांच्या दौर््यानंतर पुन्हा सुस्त झाल्याचा अनुभव वनकुटेकरांना आला आहे. तीन दिवसांत पंचनामे व आठवडयात भरपाई, दोन दिवसांत निवाऱ्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनकुटे दौऱ्यात केली होती.
मात्र, दोन दिवस उलटूनही सरसकट पंचनामे न होता ठराविक ठिकाणचेच पंचनामे केले जात असून, वांकुटीसह पळशी, गाजदीपुर, तास, गादेझप, वडगाव साबताळसह आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांचे पंचनामे बाकी असून, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेला हरताळ फासण्याचे काम प्रशासन करीत असल्याची भावना, या गावकऱ्यांमध्ये आहे.
अजूनही आमच्याकडे कोणी आलेच नाही
एकीकडे मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या हिरामण बर्डे व कचरू वाघ यांच्या निवाऱ्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर युध्दपातळीवर सुरू झाल्यानंतर असेच छप्पर उडून संसार उघडयावर पडलेल्या मच्छिंद्र साळवे व जालिंदर साळवे यांच्यापर्यंत बुधवारी दुपारपर्यंत प्रशासन पंचनाम्यासाठी पोहचलेही नव्हते.
आमचं कुटुंब उघडयावर आहे, स्वयंपाकासाठीही जागा नाही. आम्ही काय करावं, असा सवाल मच्छिंद्र साळवे यांनी केला. साहेबराव बाचकर, बाबू पठारे यांच्यापर्यंतही पंचनामा करणारे पथक पोहचले नसल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यानंतर फक्त २२ पैकी दोनच घरांचे कामे झाले असून, वीस बाधित घरे छपरासाठी प्रतीक्षेत आहे तर महावितरण कंपनीकडून फक्त वनकुटे गावठाणाची वीज सुरळीत करण्यात आली आहे.
अजूनही वाडया,वस्त्यांवर, वीजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही. तर वनकुटे गावठाणात सरकारतर्फे टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, वाड्यावस्त्यांवर विजेअभावी नागरिकांसह पशुधनाला पाणी व चाऱ्याचा प्रश्न तसाच आहे.
दरम्यान, राज्याच्या प्रमुखांनी येऊन दोन दिवसांत निवारा उपलब्ध करून देण्याचे आदेश देऊनही प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या दोनच घरांना निवारा उपलब्ध करून दिला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा अवहेलना करणाऱ्या प्रशासनाविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आंदोलन करण्याचा पवित्र्यात नागरिक आहेत.
दौऱ्याचे नियोजन करता आले नाही
वनकुटयातील नुकसान मोठे असून, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या भाषणात मान्य केले. मात्र, प्रशासनास झालेल्या नुकसानीची मांडणीच करता आली नाही. पडझड झालेल्या दोनपेक्षा अधिक घरांची पाहणी करता येणे सहज शक्य होते. मात्र, त्याचे नियोजनच झाले नाही.
शबरी योजनेंतर्गत आगोदरच घरकुले मंजूर आहेत. मग मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात नेमके काय मिळाले ? सरसकट पंचनामे करून भरपाई मिळणे, पडझड झालेल्या सर्व कुटुंबांना तात्काळ निवारा मिळणे अपेक्षित होते.
किमान आदिवासींसाठी एखाद्या निवारागृहाची घोषणा झाली असती तरी या लोकांचे विविध कार्यक्रम तेथे होऊ शकले असते. आज हा समाज झाडाखाली विवाह पार पाडतो. निवारागुहाचा त्यासाठी उपयोग झाला असता. असे मत अँड. राहुल झावरे यांनी व्यक्त केले.