केडगावातील ते अनधिकृत नळ शिवसैनिकांनी केले बंद…पुन्हा जोडूनच दाखवा मग

नगर -कल्याण महामार्गावर रस्त्याच्या बाजूलाच उभारण्यात आलेल्या ड्रीम सिटीने केडगावची मुख्य जलवाहिनी फोडून अनधिकृतपणे चार इंची नळ जोडणी केली होती.
याप्रकरणी परिसरातील नागरिकांसह शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला होता. केडगावच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारण्याचे काम ड्रीम सिटीचे वर्षानुवर्षे सुरू होते.
यामुळे शिवसेना नगरसेवक विजय पठारे, अमोल येवले, सुनीता कोतकर, शांताबाई शिंदे यांनी महासभेत प्रश्न देखील उपस्थित केला होता. परंतु अधिकारी मान्य करण्यास तयार नव्हते.
अखेर शिवसेना नगरसेवकांनी प्रत्यक्ष ड्रिम सिटी येथे जाऊन याठिकाणी असणारा पाण्याचा अनाधिकृत जोड तोडला. केडगाव शिवसेना व नागरिकांच्या वतीने या प्रश्नी वेळोवेळी पत्रव्यवहार, निवेदन देण्यात आले होते.
मात्र, मनपाचे काही पदाधिकारी व काही लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादामुळे ड्रीम सिटी वरचा कृपा आशीर्वाद होता. वारंवार मनपा प्रशासनाला निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने शिवसैनिक संतापले होते.
अखेर शिवसेना नगरसेवक पठारे, येवले व सहकार्यांनी रस्त्यावर उतरत सदरचा अनधिकृत जोड जेसीबीच्या साह्याने उखडून टाकले. आता भविष्यात केडगावच्या मुख्य जलवाहिनी तोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला शिवसेना योग्य भाषेत उत्तर देईल, असे जाहीर आवाहन शिवसेनेच्या वतीने मनपा प्रशासनाला दिले आहे.