अहमदनगर

Shivaji Kardile News : माजी आमदार शिवाजी कर्डिलेंकडून विधान परिषदेसाठी मोर्चेबांधणी !

Shivaji Kardile News :- नगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद लढवायचीच असा ठाम निश्चय माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलेला दिसत आहे. उमेदवारी कोणत्या पक्षाकडून करणार हे गुलदस्त्यात ठेवून त्यांनी विधान परिषदेसाठी तयारी सुरू केली.

त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना व विधान परिषदेच्या ३९६ मतदारांना दिवाळी निमित्ताने शुभेच्छा आणि मिठाई पोहच केली.

जिल्ह्यातील राजकारणात खासदार विखेंच्या प्रचार यंत्रणेची नेहमी चर्चा होते. त्या बरोबरीची प्रचार यंत्रणाही कर्डिले यांची मानली जाते. अंतर्गत तयारी काही महिने आधी सुरू झाली असते. मोजक्या मतदानाच्या निवडणुकीत कर्डिले यांचे कार्ड कायम चालले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सेवा सोसायट्यांचे जास्तीत जास्त ठराव कर्डिले यांनी अगोदरच बाजूने करून घेतले होते. संभाव्य विरोधक म्हणून रणांगणात उतरणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांचा ठराव होऊ न देता त्यांना निवडणुकी अगोदरच रणांगणातून बाहेर केले.

बाजार समितीसाठीही कर्डिले यांनी तयारी करून ठेवलेली दिसून येत आहे. राहुरीतून गेलेली आमदारकी विधान परिषदेच्या माध्यमातून परत मिळवण्यासाठी कर्डिले यांनी चंग बांधल्याचे तयारीवरून दिसून येत आहे.

विधान परिषदेच्या २ टर्म पूर्ण केल्यानंतर राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप यांच्याऐवजी शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

त्यामुळे सोधा पक्षीय राजकारणातून जगताप यांचे सहकार्य घेऊन विधान परिषद जिंकण्याची तयारी कर्डिले यांनी सुरू केली. पक्ष कोणताही असेल, पण निवडणूक लढवायची या हेतूने त्यांची वाटचाल सुरू आहे.

कर्डिले दरवर्षी पाडव्याला मतदार संघातील मतदारांना फराळासाठी निमंत्रण देतात. पण यावेळी प्रथमच त्यांची मिठाई ही जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना आणि प्राधान्याने विधान परिषद मतदारांना दिवाळीआधी पोहोच झाली.

त्यावरून कर्डिलेंनी विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. त्या मिठाई बॉक्सवर कोणत्याही पक्षाचा उल्लेख नाही. यावरून ते निवडणूक लढवणार पण पक्ष अजून स्पष्ट केला नाही.

त्यातच कर्डिले यांच्या बालेकिल्ल्यात राज्यमंत्री तनपुरे यांनी नागरदेवळे नगर परिषद अधिसूचना जाहीर करून कर्डिलेंची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला.

महाविकास आघाडीने कर्डिले यांच्या विरोधात रान उठवले. त्यामुळे कर्डिले यांना राजकीय अस्तिव टिकवायचे असेल, तर विधान परिषद माध्यमातून आमदार होण्याचा चंग बांधला.

अश्याच अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या आणि नव नवीन अपडेट्स साठी फॉलो करा आम्हाला गुगल न्यूज वर !

Related Articles

Leave a Reply

Back to top button