अहमदनगर

धक्कादायक: 50 वर्षीय पुरूषाचा विहिरीत मृतदेह आढळला

अहमदनगर- विहिरीत एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील शिवारात सोमवार दि. 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता ही घटना उघडकीस आली. ऐन दिवाळीच्या दिवशीच विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

तळेगाव दिघे येथील रवींद्र सिताराम दिघे (वय अंदाजे 50 वर्ष) यांचा मृतदेह तळेगाव ते जोर्वेकर वस्ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील एका विहिरीत आढळून आला.

 

दुपारी रवींद्र दिघे यांच्या पत्नी शेताकडे गेल्या असता त्यांना पतीचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना आढळून आला. त्यामुळे त्यांना धक्का बसला. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी संगमनेर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रहिवाशांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला.

 

याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अत्यंत शोकाकुल वातावरण रात्री रवींद्र दिघे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तळेगाव दिघे येथे या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button