धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केलं गर्भवती; नराधम आरोपीला…

अहमदनगर- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणार्या नराधमाला 20 वर्षे सक्त मजुरी व 50 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सोमनाथ भानुदास म्हस्के (वय 28 रा. उक्कडगाव ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम. ए. बरालिया यांनी हा निकाल दिला. तसेच दंडाची रक्कम पिडीतेस देण्याचा आदेश केला आहे. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सतीश पाटील यांनी काम पाहिले.
14 फेब्रुवारी, 2020 रोजी दुपारी अल्पवयीन मुलगी ही शेतात जात असताना सोमनाथ भानुदास म्हस्के हा तेथे आला व पिडीत मुलीस बाजुस असलेल्या शेतात घेऊन गेला. तेथे तिच्यावर अत्याचार केला. तसेच 4 जुलै, 2020 रोजी दुपारी पिडीत अल्पवयीन मुलगी ही शेतात जात असताना आरोपी हा तेथे आला व पिडीतेस म्हणाला की, बाजुला चल असे म्हणून शेजारील कडवळ असलेल्या शेतात घेऊन गेला. तिच्यावर पुन्हा तेथे अत्याचार केला व तेथून निघून गेला.
जानेवारी 2021 चे पहिल्या आठवड्यात पिडीतेस त्रास होत असल्याने तिचे आईने तिला दवाखान्यामध्ये उपचारकामी घेवून गेली. तेव्हा डॉक्टरांनी पिडीतेची सोनोग्राफी केली असता, ती गर्भवती असल्याचे सांगितले.
त्यानंतर पिडीतेने झालेल्या अत्याचारासंबंधी स्नेहालय येथे मदतीसाठी धाव घेतली. स्नेहालयाचे मदतनीस प्राची वाबळे यांनी पिडीतेस नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरूध्द फिर्याद देणे संबंधी सहकार्य केले व आरोपीविरूध्द फिर्याद नोंदविण्यात आली. त्यानंतर आरोपी विरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात भादंवि. कलमानुसार व बालकांचे लैगींक अपराधापासून संरक्षण करणारा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी. आर. जारवाल यांनी केला. संपूर्ण तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती बरालिया यांच्या न्यायालयात चालला. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले.
त्यामध्ये अल्पवयीन फिर्यादी, पंच, सरकारी दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी व तपासी अमंलदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेला कागदोपत्री पुरावा व डी.एन.ए. रिपोर्ट (बाळाचा) व तोंडी पुरावा, सरकार पक्षाचा युक्तिवाद तसेच सरकार पक्षातर्फे दाखल करण्यात आलेले सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांचे न्याय निवाडे ग्राह्य धरून आरोपी सोमनाथ भानुदास म्हस्के यास न्यायालयाने 20 वर्षे सक्त मजुरी व 50 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी पोलीस हवालदार के. एन. पारखे यांनी सहकार्य केले.