धक्कादायक: नवजात बाळाला कालव्यात फेकलं अन् केला अपहरणाचा बनाव

अहमदनगर- पाचव्या अपत्याला जन्म दिल्यानंतर पुन्हा मुलगीच झाल्याने जन्मदात्या आईनेच नवजात मुलीला पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात फेकल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी संबंधित 30 वर्षीय परप्रांतीय महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सुनिता नंदराम प्रजापती असे सदर महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा येथे वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय सुनिता प्रजापती महिलेने शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास 15 दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा बनाव करत आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मात्र, तक्रार नोंदवताना पोलिसांना महिलेने सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानुसार पोलिसांनी तपासही सुरू केला. मात्र, पोलिसांना काही सुगावा लागेना.
त्यानंतर महिलेच्या सांगण्यावर आणि तिच्या वागण्याचा पोलिसांना संशय वाटू लागला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला चौकशीसाठी शनिवारी ताब्यात घेतलं. पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथक यांनी पोलिसी खाक्या दाखवताच संबधित महिलेने पोलिसांना सांगितले की, पहिल्या तीन मुली तर चौथा मुलगा असून वंशाला अजून एक दिवा हवा म्हणून अजून एका अपत्याला जन्म दिला. पण पुन्हा मुलगीच झाल्याने आपणच आपल्या पोटच्या बाळाला पिंपळगाव जोगा कालव्यात फेकल्याची कबुली दिली.
या घटनेने आळेफाटा परिसरात एकच खळबळ उडाली होती. कालव्याला पाणी सुरू असताना ते अर्भक पाण्यात फेकले होते. महिलेने कबुली दिल्यानंतर कालव्याचे पाणी कमी करून ते शोधण्याचे प्रयत्न पोलिसांकडून युद्ध पातळीवर केला जात आहे. आळे, राजुरी, रानमळा, बेल्हा, आळकुटी, पारनेर भागातील कालव्यात किंवा पाण्याच्या चारी मध्ये कुणाला हिरव्या रंगाचे टी-शर्ट घातलेले आणि पिवळसर रंगाच्या शालीमध्ये गुंडाळलेले अर्भक आढळून आल्यास आळेफाटा पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी आरोपी महिलेला प्रथमवर्ग न्यायालयात जुन्नर येथे हजर केले असता न्यायालयाने महिलेला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली असून पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहायक पोलिस उपनिरीक्षक रागिणी कराळे पुढील तपास करत आहे.