अहमदनगर

धक्कादायक: कोरोना काळातील कोविड सेंटरला बोगस परवानग्या; पोलिसांकडून चौकशी सुरू

अहमदनगर- सन 2020 मध्ये कोविड नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने 29 एप्रिल 2020 रोजी कोविड उपचार केंद्र स्थापन करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड सेंटर व डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल असे वर्गीकरण करून मनपा क्षेत्रात आयुक्तांना साथरोग नियंत्रणाचा सक्षम अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

 

दरम्यान कोरोना काळात परवानगी देण्याचे अधिकार नसतानाही मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी मनपा क्षेत्रातील डॉक्टरांना हाताशी धरून बोगस कोविड सेंटरला परवानग्या दिल्या. त्या कोविड सेंटरमध्ये तीव्र लक्षण असणार्‍या रुग्णांना बेकायदेशीरपणे दाखल करून घेण्यात आले. त्यांच्या मृत्यूस सदर हॉस्पिटल जबाबदार असून, त्यांच्यावर संगनमताने फसवणूक व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार मनसेचे संदीप भांबरकर यांनी पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. कोतवाली पोलिसांकडून याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

 

कोतवाली पोलिसांनी 39 डॉक्टरांना नोटिसा बजावल्या असून, महापालिका आयुक्तांना पत्र देऊन माहिती मागवली आहे. आयुक्तांना कोविड सेंटरला परवानगी देण्याचे अधिकार दिलेले होते. असा दावा भांबरकर यांनी केला आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांनी परवानगी दिलेल्या 39 हॉस्पिटलविरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार त्यांनी केली आहे.

 

कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कचरे यांच्यामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांनी मनपा आयुक्तांमार्फत किती व कोणत्या हॉस्पिटल व डॉक्टरांना कोविड सेंटर व हॉस्पिटल सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली, परवानगी देण्याचे अधिकार कोणाला देण्यात आले होते, कोविड हॉस्पिटलला परवानगी देताना कोणत्या पथकाने, अधिकार्‍याने निकषपूर्तीची पाहणी करून अहवाल दिले.

 

कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी राज्य शासनाचे व केंद्र शासनाचे काय निर्देश आहेत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांना परवानगी देण्याचा अधिकार देण्यात आला होता का, त्यांना परवानगी देण्याचे अधिकार प्रदान केल्यानंतर इतर कोणत्या अधिकार्‍याने परवानग्या दिलेल्या आहेत का, कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये औषधोपचारादरम्यान मयत झालेल्या रुग्णांचे नाव, पत्ता व हॉस्पिटलच्या नावांची यादी अशा विविध मुद्द्यांवर माहिती व कागदपत्रे मागविण्यात आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button