अहमदनगर

धक्कादायक: प्रवरा नदीपात्रात आढळले दोन तरूणांचे मृतदेह

अहमदनगर- काल सकाळी 7 वाजेच्या सुमारास प्रवरा नदीपात्रात 28 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. तर प्रवरा नदीवरील जुन्या पुलाखाली नदीपात्रात आणखी एका 30 ते 35 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

 

संगमनेर शहरातील मोगलपुरा पुणारोड येथे राहणारा 28 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची खबर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्याचा शोध सुरू असतानाच त्याच्यासह आणखी एका तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

 

अमोल अण्णासाहेब आव्हाड (वय 28, रा. मोगलपुरा, पुणा रोड, संगमनेर) असे एका मयत तरूणाचे नाव आहे. अमोल हा त्याच्या राहत्या घरातून 2 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता कुणाला काही एक न सांगता निघून गेला होता. अमोल हा नेहमीप्रमाणे पहाटे उठून हमाली करण्यासाठी बाजारात जात असतो. तसाच तो गेला असावा असा अंदाज त्याच्या आईला आला. मात्र दुपारी तो घरी जेवण करण्यासाठी आला नाही. त्याचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो मिळून आला नाही.

 

 

अखेर त्याची आई उषा आव्हाड यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली होती. दरम्यान काल सकाळी फादरवाडी सर्व्हिस स्टेशनच्या जवळ प्रवरा नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर मृतदेह पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी कॉटेज रुग्णालयात पाठविला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित महाजन करत आहेत.

 

तर प्रवरा नदीपात्रावरील जुना मोठा पुलाच्या खाली नदीपात्रात एका 30 ते 35 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत संगमनेर खुर्दचे पोलीस पाटील किरण गुंजाळ यांनी शहर पोलीस ठाण्यास खबर दिली. त्यानुसार पोलीस नाईक धादवड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सदर मृतदेह कॉटेज रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. श्री. गुंजाळ यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक श्री. धादवड करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button