धक्कादायक: ‘या’ निधी कंपनीच्या संचालकांनी ठेवीदारांना लावला 44 लाखाला चुना

अहमदनगर- जवळके (ता. राहाता) येथील शनिछत्र अर्बन मल्टीनिधी लिमिटेड या निधी कंपनीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी संगनमताने ठेवीदारांच्या पैशांची अफरातफर करून 43 लाख 53 हजार रकमेची आर्थिक फसवणूक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे निधी कंपनीच्या ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील अनिता रवींद्र कुटे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, जवळके येथील शनिछत्र अर्बन मल्टी निधी लिमिटेड घोडेवाडी येथे सध्या सहाय्यक शाखा प्रबंधक म्हणून काम करत आहे. पती रवींद्र कुटे करोनामुळे मयत झाले. त्यांचे मॅक्स लाईफ टर्म इन्शुरन्स मेडिक्लेम आदींचे लाख रुपये नॉमिनी म्हणून माझ्या बँक ऑफ महाराष्ट्र या खात्यात प्राप्त झाली होती.
मी काम करत असलेल्या शनिछत्र अर्बन जवळके मल्टी निधी लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष नितीन विलास शिंदे व उपाध्यक्ष अभिजीत विश्वनाथ रासकर व संचालक मंडळाचे संचालक रवींद्र बाबुराव गोरडे, शिवाजी निवृत्ती भोंगळ, भूषण रोहिदास गरुडकर, अरुण चिंतामणी, अमोल प्रवीण पाचरणे असे सदस्य आहेत.
नितीन विलास शिंदे व अभिजीत विश्वनाथ रासकर यांनी मला नोव्हेंबर मध्ये त्यांच्या निधी कंपनीमध्ये वर्षभरासाठी काही रक्कम मुदत ठेव करा. तुम्हास जास्त व्याजदर देऊ तसेच मासिक ठेव करता अधिक टक्के दराने व्याज देऊ असे सांगितले. मुदत ठेव आवडली नाही तर दोन महिन्यानंतर सर्व मुदत ठेव रक्कम पूर्णपणे काढू शकता असे सांगितले. त्यावेळी मला हा व्याजदर चांगला वाटल्याने मुलगी अन्विता हिचे नावाने बचत खात्यामध्ये काही रक्कम मुदत ठेव ठेवली.
पुतण्या सुमित अशोक व आदेश अशोक कुटे यांच्या नावाने डेली कलेक्शन तसेच माझ्या नावाने सेविंग अकाउंटमध्ये व मुदत ठेव मध्ये काही रक्कम जमा केली.
त्यानंतर माझे पतीचे श्राद्ध असल्यामुळे मला पैशाची गरज होती. या ठेवीतून काही पैसे द्यावे. म्हणून आपण चेअरमन यांच्याकडे मागणी केली असता पुढील महिन्यात पैसे देवू असे सांगितले. मात्र त्यांनी पैसे न देता पत्येक वेळी पुढील महिन्यात पैसे देवू असे सांगितले. त्यानंतर त्यांचे कार्यालयात येण्याचे बंद झाले. कंपनीचे मॅनेजर पाडेकर मला घेऊन त्यांच्या घरी गेले. मात्र ते भेटले नाहीत. निधी कंपनीत ठेवीदार सुनील बन्सी चिने, नंदकिशोर बाजीराव चासकर, ज्ञानदेव विठ्ठल गुंजाळ, ज्योतिष शरद निरगुडे, ऋषिकेश रावसाहेब काळे यांच्याही ठेवी आहेत.
माझे व इतर ठेवीदारांनी अनेकदा संपर्क करूनही देखील या शनिछत्र निधी कंपनीचे चेअरमन, व्हा. चेअरमन संचालक पैसे देण्यास टाळाटाळ करून कोणत्याही प्रतिसाद देत नाहीत. आमचे पैसे मिळालेले नाहीत. वेळोवेळी उडवाउडवीचे उत्तर ते देत आहेत. त्यामुळे आमची आर्थिक फसवणूक झाली आहे. माझे 38 लाख 75 हजार 500 तर इतर ठेवीदारांची रक्कम मिळून 43 लाख 53 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक शनिछत्र अर्बन जवळके मल्टीनिधी लिमिटेड घोटेवाडी जवळके तालुका कोपरगावचे चेअरमन नितीन विलास शिंदे, व्हा. चेअरमन अभिजीत विश्वनाथ रासकर व संचालक रवींद्र बाबुराव गोरडे अहमदनगर यांनी केली आहे.
अनिता कुटे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 19 /23 नुसार भादवि कलम 120 बी, 34, 406, 420, 506 त्याचप्रमाणे महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हित संरक्षण अधिनियम तीन व पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील अधिक तपास करत आहेत.