धक्कादायक: मार्केटमध्ये ‘या’ नामांकित कंपनीची बनावट चहापावडर; पोलिसांनी केली कारवाई

अहमदनगर- सपट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्यावतीने सपट परिवार चहा पावडरची विक्री केली जात आहे. कंपनीच्या नावाशी साम्य व कंपनीच्या नावाचा लोगो वापरून नगर शहरात बनावट चहा पावडरची विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्यासह कंपनीच्या संयुक्त पथकाने येथील डाळमंडई भागात कारवाई करत सपट परिवार चहा पावडरशी साम्य असणारे 20 बनावट चहाचे पाऊच जप्त केले आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सागर ट्रेडर्सचा मालक सागर विलास मुनोत (रा. दाळमंडई) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड (परळी, मुंबई) कंपनीचे सेल्स मॅनेजर अजय रामचंद्र मोरे (वय 47 रा. मोरगे वस्ती, श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली आहे.
दाळमंडळ येथील सागर ट्रेडर्स या दुकानात दुकानाचे मालक सागर मुनोत याला कंपनीच्या प्रतिनिधींनी ओळख सांगून पंचासमक्ष या दुकानाची झडती घेतली. सपट परिवार चहा नावाचे 10 रूपये किंमतीचे 20 बनावट पाऊच या ठिकाणी आढळून आले. हा माल जप्त करण्यात आला असून दोन पाऊच प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.