धक्कादायक: शेतकऱ्याच्या डोक्यात कुर्हाडीने केले पाच वार

अहमदनगर- नगर तालुक्यातील गुंडेगाव शिवारात पूर्ववैमन्यस्यातून एका शेतकर्याच्या डोक्यात कुर्हाडीने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. नामदेव पोपट भापकर (वय 39 रा. गाडेकर वस्ती) असे जखमी शेतकर्याचे नाव आहे.
उपचारादरम्यान त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून अंकुश ऊर्फ भाऊसाहेब कुंडलिक कासार (रा. गुंडेगाव) याच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नामदेव भापकर व भाऊसाहेब कासार यांचे पूर्वीचे वाद आहेत. सोमवारी सकाळी नामदेव त्यांच्या दुचाकीवरून दूध घालण्यासाठी गावात चालले होते. भाऊसाहेब कासारच्या घराजवळून ते जात असताना भाऊसाहेबने त्यांना अडविले. मागील भांडणाचा राग मनात धरून भाऊसाहेबने त्याच्या हातातील लोखंडी कुर्हाडीने पात्याकडून नामदेव यांच्या डोक्याच्या पाठीमागील भागावर पाच वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
जखमी अवस्थेत नामदेव खाली जमिनीवर कोसळल्यानंतर भाऊसाहेबने कुर्हाडीच्या तुंब्याने त्यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.