अहमदनगर

धक्कादायक: पतीकडून पत्नीची हत्या; पतीला न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा

अहमदनगर – पत्नीस जीवे ठार मारल्याप्रकरणी पतीला श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस. शेख यांनी खुनाच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. शंकर किशोर साळवे (वय 22 रा. श्रीरामनगर, मिरजगाव ता. कर्जत) असे शिक्षा ठोठावलेल्या पतीचे नाव आहे.

या घटनेतील फिर्यादीची बहिण नेहा ही पोथरे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील होती. ती एकटीच मुळ गावी राहत असताना तीची शंकर किशोर साळवे याच्याशी प्रेम विवाह झाला. नेहा हिचे वय त्यावेळी 17 वर्षे होते. लग्नानंतर नेहा ही तिचे सासरी मिरजगाव येथे नांदण्यास गेली. काही दिवसांनी पती-पत्नीत वाद झाले. 8 मार्च, 2021 रोजी या घटनेतील फिर्यादीसमोरच नेहा व शंकर यांच्यात कडाक्याचे भांडण चालू होते. शंकर हा नेहाला शिवीगाळ करत होता. शंकरने नेहाला फिर्यादी समोरच तोंडावर जोरात बुक्की मारली व तिला खाली पाडून जोर – जोरात लाथा – बुक्यांनी कमरेच्या बेल्टने मारहाण करताना तिला गळ्याला व केसाला धरून तीचे डोके घरातील भिंतीवर आपटले. फिर्यादी व शंकरच्या वडीलांनी मारहाण करू नको असे सांगितले मात्र तो कोणाचे ऐकत नव्हता.

हे पाहवत नसल्याने नेहाची फिर्यादी बहिण व भाऊ हे तेथून दुसर्‍या गावाकडे निघाले. त्याचवेळी त्यांना मोबाईलवरून शंकरने सांगितले की, नेहा हिने घरात फाशी घेतली आहे व मी तिला मिरजगाव येथील दवाखान्यात घेवून आलो आहे. ती माझ्याशी बोलत नाही तुम्ही लवकर या असे सांगितले. नेहा मयत झाली होती.

मयत नेहा हिचे बहिणीने तिच्या पतीविरूध्द तीला वर नमूद केल्याप्रमाणे मारहाण करून जिवे ठार मारले म्हणून कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपींविरूध्द पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एम. एस. शेख यांच्या न्यायालयात झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, वैद्यकिय अधिकारी, तपासी अधिकारी व पंच साक्षीदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने अतिरीक्त सरकारी वकील संगिता ढगे यांनी पाहिले. पैरवी अधिकारी आशा खामकर यांनी सहकार्य केले. न्यायालयासमोर आलेला साक्षी, पुरावा व सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button