धक्कादायक: पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून

अहमदनगर – पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील रेल्वेस्टेशन येथे घडली. दरम्यान पतीने पत्नीचा खून केल्यानंतर तिला फाशी घेतलेल्या अवस्थेत घरात लटकवून पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव केला होता. मात्र पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंद्रजीत जाधव याने त्याची पत्नी उज्ज्वला इंद्रजीत जाधव, (वय 22 ) हिने घरातील पत्र्याच्या अँगलला ओढणी बांधून आत्महत्या केली, असा बनाव केला होता. मात्र इंद्रजीत जाधव याने त्याच्या पत्नीचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर तिला फाशी घेतलेल्या अवस्थेत लटकविले होते. खासगी रुग्णवाहिकेला बोलावून त्याने पत्नीला दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
परंतु रुग्णवाहिकाचालकाने पोलीस ठाण्यात कळविल्याशिवाय मृतदेह हलविण्यास नकार दिला. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता राहुरी पोलिसांना माहिती समजली. पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील व परीविक्षाधीन उपनिरीक्षक ज्योती डोके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची बारकाईने पाहणी केल्यावर त्यांना संशय आला. मृतदेहाच्या गळ्याला जखम असल्याचे दिसले. पोलिसांनी इंद्रजीत जाधव याला ताब्यात घेतले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
इंद्रजीत जाधव याने पळून जाऊन उज्ज्वला हिच्याशी लग्न केले होते. मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आरोपी दारू पिऊन पत्नीला मारहाण करीत होता. तुझ्या आईला केस मागे घ्यायला सांग, असा आग्रह करीत होता. परंतु मुलीच्या आईने न्यायालयातील याचिका मागे घेण्यास नकार दिला.
या रागातून आरोपीने पत्नीचा गळा आवळून खून केला. नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला. असे प्रथमदर्शनी समोर आले आहे. आरोपीला विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर आरोपीने खुनाची कबुली दिली. आरोपीला ताबडतोब ताब्यात घेतले आहे. मृत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी बंडू उर्फ इंद्रजीत रामदास जाधव रा. गौतमनगर, राहुरी रेल्वेस्टेशन ता. राहुरी याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.