अहमदनगर

धक्कादायक: कांद्याच्या पैशाच्या कारणातून एकाचा खून

अहमदनगर- कांद्याच्या पैशाच्या कारणातून दोघा तरुणांनी एकाच खून केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागात घडली. अंकुश रानू लामखडे (वय 55, रा. केळवाडी, ता. संगमनेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

ही घटना 29 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारच्या सुमारास अकोले तालुक्यातील जाचकवाडी शिवारात घडली. याप्रकरणी जाचकवाडी, ता. अकोले येथील दोघांना घारगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

आरोपींनी लामखडे यांच्या डोक्यात खोरे मारून त्यांना ठार करून एका टोमॅटोच्या शेतात नेऊन पुरले होते. हे दोघे आरोपी कांदे घेऊन ते विकण्याचा व्यावसाय करतात. कांदे खरेदीसाठी त्यांनी लामखडे यांच्याकडून हातउसनी रक्कम घेतली होती.

 

वेळोवेळी पैसे मागूनही आरोपींनी पैसे न दिल्याने लामखडे यांनी तगादा लावल्याने दोघांनी त्यांची हत्या केल्याची बाब समोर येत आहे. ही घटना दि. 30 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी रात्री उशिरा अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

यातील एका आरोपीची अंकुश लामखडे यांच्याशी ओळख झाली होती. आरोपीने जाचकवाडी शिवारात काही ठिकाणी शेती देखील वाट्याने केली होती. तसेच तो अनेक शेतकर्‍यांचे कांदे विकत घेऊन तो माल तेथेच ठेऊन शेतकर्‍यांना कांद्याची रक्कम देत असे.

 

काही दिवसांनंतर हे कांदे उचलुन तो दुसर्‍या व्यापार्‍यांना देत असे. त्यासाठी याला काही पैसे गुंतवावे लागत होते. त्यामुळे, त्याने काही रक्कम ही लामखडे यांच्याकडून हातउसनी घेतली होती. मात्र, दरम्यानच्या काळात कांद्याला बाजार सापडले किंवा त्याच्याकडे पैसे आले नाही. त्यामुळे, तो लामखडे यांचे पैसे परत करून शकला नाही.

 

दरम्यान अंकुश लामखडे यांनी आरोपींकडे वारंवार तगादा लावला होता. आज नाही उद्या देतो असे करून दिलेले वायदे टळत होते. त्यामुळे, लामखडे यांनी मागणीचा जोर वाढविला होता. दि. 29 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी ही दोघे जाचकवाडी शिवारात एकमेकांना भेटले होते. तेथे त्यांच्यात पैशाहून वाद झाल्याची माहिती मिळते. मात्र, हा वाद टोकाला गेल्यामुळे या दोघा आरोपींनी अंकुश लामखडे यांची हत्या केली, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

 

दरम्यान, रात्र झाली तरी लामखडे हे घरी आले नाही त्यामुळे, त्यांचा कुटुंबातील लोकांनी शोध घेतला. मात्र, तरी देखील ते मिळाले नाही. म्हणून यांनी थेट घारगाव पोलीस ठाणे गाठत मिसिंग दाखल केली. वयस्कर माणूस आहे. त्यामुळे, सकाळी ते घरी येतील अशा प्रकारची धारणा सगळ्यांनी केली. मात्र, दुसर्‍या दिवशी सकाळी जाचकवाडी शिवारात काही व्यक्तींनी एक गाडी आणि चपला ह्या शेताच्या कडेला पडलेल्या दिसून आल्या.

 

तेथील घटनास्थळी दिसणारी माहिती ही जरा संशयास्पद असल्यामुळे काहींनी थेट पोलिसांशी संपर्क केला. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील आणि सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

 

दरम्यान, घटना ही अकोले हद्दीत असल्यामुळे पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांची तत्काळ तपासाला गती दिली. काही काळानंतर ज्या काही शंका होत्या. त्याचा गुन्ह्याच्या दृष्टीने तपास सुरू केला. तर, काही सबळ पुरावे हाती आल्यानंतर त्यांनी एक संशयीत म्हणून पहिल्यांदा एका आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर दुसर्‍या आरोपीसही ताब्यात घेतले आहे. त्यानंतर घटनाचा उलगडा झाला. याप्रकरणी रात्री उशिरा अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button