अहमदनगर

धक्कादायक! वेठबिगारासाठी अल्पवयीन मुलांची विक्री; रॅकेट आलं समोर

अहमदनगर- नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथून 6 अल्पवयीन मुलांना वेठबिगारासाठी नगर जिल्ह्यातील संगमनेर व पारनेर तालुक्यात आणण्यात आले होते.

 

संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे एक तर पारनेर तालुक्यातील पळशी येथे पाच मुले होती. या बालमजुरांना वेठबिगारीतून इगतपुरीच्या श्रमजिवी संघटनेच्या मदतीने मुक्त करण्यात आले असून आरोपींविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

प्रकाश पुणेकर (रा. डिग्रस, ता. संगमनेर) याने गेल्या पाच वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील उभाडे गावातील एका अल्पवयीन मुलाला त्याच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे आणले. तेथे त्याला शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी कामाला ठेवले. दरम्यान मुलाचा शोध घेण्यात येत होता. ही वार्ता श्रमजिवी संघटनेला समजली.

 

या संघटनेने या घटनेचा पाठपुरावा केला. सदर मुलगा हा संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे असल्याचे कळाले. श्रमजिवी संघटनेचे पदाधिकारी व सदर मुलाचे पालक यांनी याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास माहिती दिली. पोलिसांच्या मदतीने सदर मुलाला डिग्रस येथून ताब्यात घेण्यात आले.

 

मुलाचा अज्ञात पणाचा फायदा घेत वेठबिगार म्हणून ठेवल्याने सदर पालकाने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रकाश पुणेकर याच्याविरुद्ध वेठबिगार पद्धती उच्चाटन अधिनियम 16,17,18 तसेच बालमजुर व अनुसुचित जाती कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार सय्यद करीत आहेत.

 

 

तसेच इगतपुरीच्या उभाडे येथूनच एक 13 वर्षीय मुलगा, देवळे येथून 13 वर्षीय मुलगी, उभाडे येथून 13 वर्षीय मुलगा, 12 वर्षीय मुलगा, 15 वर्षीय मुलगा यांना देखील त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून ही मुले रामदास लव्हाटे (रा. पळशी, ता. पारनेर), रावा खताळ (रा. ढवळपुरी, ता. पारनेर), रामा पोकळे (रा. पळशी, ता. पारनेर), कांतीलाल कारंडे (रा. वनकुटे पळशी, ता. पारनेर) यांनी वेठबिगार म्हणून नेले. गेली तीन वर्ष त्यांनी तेथे त्यांच्याकडून कामे करुन घेतली. ही कामे करुन घेत असतांना त्यांना मारहाणही करण्यात आली.

 

याबाबतची माहिती इगतपुरीच्या श्रमजिवी संघटनेला समजली. संघटनेचे सचिव सुनिल किसन वाघ व संजय रामचंद्र शिंदे यांच्या मदतीने सदर मुलांची सुटका केली. त्यांना संगमनेरचे तालुका दंडाधिकारी यांच्या समोर हजर केले. त्यांनी मुक्त वेठबिगार असल्याचे प्रमाणपत्र दिल्याने बालमजुराच्या पालकाने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पारनेर तालुक्यातील वरील चौघांविरुद्ध वेठबिगार पद्धत उच्चाटन अधिनियम 16,17,18 व बालमजुर व अनुसुचित जाती कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सदरची घटना पारनेर तालुक्यात घडलेली असल्याने सदरचा गुन्हा हा उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर यांच्या मार्फत पारनेर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button