धक्कादायक: अल्पवयीन मुलीचे सेल्फी फोटो सोशल मीडियावर…

अहमदनगर- आधी अल्पवयीन मुलीचा मोबाईल नंबर मिळवला. नंतर तिच्यासोबत सोशल मीडियावर संपर्क करून बोलणे सुरू केले. तिच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी देखील केली.
दरम्यान हा प्रकार करणार्या तरूणाला त्या मुलीसह तिच्या वडिलांनी धडा शकविला आहे. त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विकास भगवान जगदाळे (रा. रूईछत्तीशी ता. नगर) या तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील एका गावात राहणार्या पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे.
विकासने अल्पवयीन मुलीचा मोबाईल नंबर घेतल्यानंतर तिला व्हॉट्सअप मेसेज, व्हिडिओ कॉल करत होता. एक दिवस त्याने मुलीला बोलवून घेतले व बळजबरीने मोबाईलमध्ये सेल्फी फोटो काढले. याला पीडित अल्पवयीन मुलीचा विरोध असल्याने तिने तिच्या वडिलांकडे तक्रार केली.
तिच्या वडिलांनी विकासला समजून सांंगितले. त्या पठ्ठ्याने त्यांचेही ऐकले नाही. त्याने मुलीला त्रास देणे सुरूच ठेवले. विकासने पीडित अल्पवयीन मुलीचे काढलेले फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करून तिची बदनामी केली. वडिलांनी मुलीसह पोलीस ठाणे गाठून विकासविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.