धक्कादायक: मुलाने केली बापाची हत्या

अहमदनगर- शेती करायला नकार देणाऱ्या वृद्ध वडिलांना मुलाने मारहाण करून त्यांची हत्या केल्याची घटना नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथे घडली. याबाबत आईच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात मुलावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसराबाई नाना गिर्हे (वय 65) रा. पिचडगाव, ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 27 जून रोजी माझे पती नाना यादव गिर्हे (वय 70) सायंकाळी पाचच्या सुमारास पिचडगाव शिवारातील आमचे शेतातील, राहते वस्तीवरील घरासमोर पाण्याच्या हाळाजवळ बसण्यासाठी जात असताना माझा मुलगा शिवाजी नाना गिर्हे (वय 27) रा. पिचडगाव ता. नेवासा याने पती नाना यादव गिर्हे यांचे नावावरील आमचे घरासमोरील शेत गट नं. 55 व 56 ही शेती मला करायला द्यावी या वादातून मुलगा शिवाजी नाना गिर्हे याने पळत जाऊन माझे पती नाना यादव गिर्हे यांना पाठीमागून जोराची लाथ मारून खाली पाडले व शिवीगाळ करत आमचे घरासमोरील चुलीजवळील लाकूड उचलून थांब तुझा काटा काढतो असे म्हणून माझे पती नाना यादव गिर्हे यांचे डाव्या बाजूच्या दंडावर, डाव्या बाजूच्या बरगडीवर व डाव्या हाताच्या मनगटावर त्याच्या हातातील लाकडाने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले.
पती नाना यादव गिर्हे यांच्यावर सिव्हील हॉस्पिटल अहमदनगर, विखे पाटील फाऊंडेशन हॉस्पिटल विळदघाट व त्यानंतर 30 जून रोजी ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचारासाठी दाखल केले. ससून हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना 1 जुलै रोजी ते मयत झाले. माझा दुसरा मुलगा बाबासाहेब याने घाबरून पती नाना यादव गिर्हे हे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जखमी होऊन मयत झाल्याचे पोलिसांना कळविले होते. माझी आता माझा मुलगा शिवाजी नाना गिर्हे याचेविरुद्ध फिर्याद देण्याची मानसिकता झाल्याने मी फिर्याद देत आहे. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी शिवाजी नाना गिर्हे याच्यावर भारतीय दंड विधान कलम 302, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मनोज मोंढे करत आहेत.