अहमदनगर

धक्कादायक: वीजमीटरमध्ये छेडछाड; 32 लाखांची वीजचोरी

अहमदनगर- वीज मीटरच्या मूळ जोडणीमध्ये छेडछाड करून गेल्या दोन वर्षात एकूण दोन लाख 21 हजार 328 युनिटसची म्हणजे एकूण 32 लाख 54 हजार 940 रूपयांची वीज चोरी केल्याचे उघड झाले आहे. आगडगाव (ता. नगर) येथील कृष्णा स्टोन क्रशर या खडी क्रशरच्या वीजजोडणीची महावितरणच्या भरारी पथकाने तपासणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

 

या प्रकरणी महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता संदीप बराट यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दिलीप रंगनाथ गायकवाड (रा. आगडगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आगडगाव येथील कृष्णा स्टोन क्रशर या खडी क्रशरच्या ठिकाणी थ्री फेज वीजजोडणी दिलेली असून सदर खडी क्रशरचे मालक दिलीप गायकवाड हे आहेत. सदर ठिकाणी तपासणीसाठी उपकार्यकारी अभियंता किसन कोपनर व कनिष्ठ अभियंता संदीप बराट यांच्या सह महावितरणचे भरारी पथक गेले असता रोहीत्रावरील वीज मीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड व फेरबदल करून या खडी क्रशरच्या ठिकाणी विजेची चोरी केल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आले.

 

यात गेल्या दोन वर्षात एकूण दोन लाख 21 हजार 328 युनिटसची म्हणजे एकूण 32 लाख 54 हजार 940 रूपयांची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. महावितरणच्या भरारी पथकाने खडी क्रशरच्या मालकाला नोटीस देऊन वीज चोरीची रक्कम 32 लाख 54 हजार 940 रूपये व तडजोडीची रक्कम 13 लाख 10 हजार अशी एकूण 45 लाख 64 हजार 940 रूपये जमा करण्यास सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत खडी क्रशरच्या मालकाने सदर रक्कम न भरल्याने खडी क्रशरचे मालक दिलीप गायकवाड याच्या विरूध्द भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button