अहमदनगर

धक्कादायक! शाळेतील अल्पवयीन मुलींना शिक्षकाने दाखविले अश्लील व्हिडीओ; पालकांनी दिला चोप

अहमदनगर- जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलींना मोबाईलवर दोन शिक्षक अश्लील व्हिडीओ दाखवत त्यांच्याशी गैरवर्तन करत असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान सोमवारी सदर विद्यार्थिनींच्या महिला पालकांनी शाळेत जाऊन या लिंगपिसाट शिक्षकांना जाब विचारत त्यांना चांगलाच चोप दिला.

 

ज्यांना विद्यार्थी गुरू मानतात त्याच शिक्षकरूपी गुरूंच्या या कृत्यामुळे शिर्डीत असंतोषाची लाट उसळली असून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या शेकडो पालकांनी दुपारी या शिक्षकांना चांगलाच चोप दिला. या बातमीची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांची फौज शाळेत दाखल होऊन आरोपी शिक्षक संजय सखाहरी थोरात व राजेंद्र माधव थोरात यांना ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

सदर मुलीप्रमाणे अन्य 10 ते 12 अल्पवयीन मुली सुद्धा या शिक्षकांच्या शिकार झाल्या आहेत. हे शिक्षक मुलींना मोबाईलवरून अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत होते. असे मुलीने पोलिसांना सांगितले.

 

 हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. मात्र हे शिक्षक मुलींना तुम्ही याची वाच्यता कुठे केल्यास तुमचा दाखला रद्द करण्याची धमकी देत होते. गरीब कुटुंबातील या मुली भीतीपोटी हा प्रकार सहन करत होत्या. एका मुलीने तर शाळेत जाणेच सोडले. तिचे शाळेत न जाण्याचे कारण जेव्हा तिच्या आईने विचारले तेव्हा या मुलीने रडत रडत सर्व हकीगत आईला सांगितली.

 

मुलीच्या आईने या गंभीर प्रकाराची माहिती इतर पालकांना सांगितली. तेव्हा अनेक पालकांनी आपल्या मुलींना विश्वासात घेत विचारणा केली असता अनेक मुलींनी हे शिक्षक आम्हाला अश्लिल फोटो दाखवत होते, असे सांगितल्याने हा प्रकार समोर आला. त्यानंतर पालकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी थेट शाळेत जाऊन या शिक्षकांना जाब विचारला. मात्र त्यांंचे उद्धट बोलणे आणि खोटं सोंग घेणे हे सर्वांच्या लक्षात आल्यावर पालकांनी या शिक्षकांना चांगलाच चोप दिला.

 

 

साईंच्या या पावनभूमितील या जिल्हा परिषद शाळेला दीडशेहून जास्त वर्ष झाली आहे. सन 1881 साली या शाळेची स्थापना झाली होती. शिर्डीतील अनेक दिग्गज नागरिक या शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे शिर्डी ग्रामस्थांचे या शाळेविषयी जिव्हाळ्याचे नाते आहे. परंतु आजवरच्या इतिहासात प्रथमच याच शाळेत असा गंभीर प्रकार घडल्याने शिर्डीत संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांनी या शिक्षकांना कठोर शिक्षा तसेच यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

 

 

या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी पोस्को कायद्या अंतर्गत भादंवि कलम 8 व 12 यासह अनुसूचित जाती जमाती कायदा अंतर्गत कलमांतर्गत आरोपी संजय सखाहरी थोरात आणि राजेंद्र माधव थोरात या दोनही शिक्षकांना अटक केली आहे. याचबरोबर इतर अल्पवयीन मुलींचे जबाब नोंदवून आणखी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली. या घटनेची माहिती जिल्हाभर वार्‍यासारखी पसरल्याने अनेक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी व मुलींच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button