धक्कादायक: तिघांनी अल्पवयीन मुलीला पळवून नेले अन् केला अत्याचार

अहमदनगर- अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले व तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यात समोर आली आहे. याप्रकरणी तीन जणांना आश्वी पोलिसांनी अटक केली आहे.
विवेक उर्फ विकी रविंद्र मुन्तोडे, अक्षय मुन्तोडे (पुर्ण नाव माहीत नाही, दोघे रा. शिबलापूर ता. संगमनेर) व गोरक्ष धोंडीबा कदम (रा. कनोली ता. संगमनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्या तावडीतून पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आश्वी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तिघांनी एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. या बाबतची तक्रार 02 जुलै 2020 रोजी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस केली असता मुलीला पुणेच्या दिशेला नेल्याचे पोलिसांना समजले.
आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी पवार, बर्डे, वाकचौरे, पाटोळे, विनोद गंभीरे, पारधी, ब्राहमणे, दिघे, सोनवणे, वर्पे, रणधीर, दांडगे, शिंदे यांचे पथक पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. या पथकाने पिडीत मुलीचा शोध घेवून मुलीला ताब्यात घेतले.
- सदर मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. तर विवेक उर्फ विकी, अक्षय आणि गोरक्ष यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर आश्वी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भोये हे करत आहे.