अहमदनगर

धक्कादायक: चारचाकीसाठी घेण्यासाठी पैसे आणले नाही म्हणून तिहेरी तलाक!

अहमदनगर- माहेरुन चारचाकी गाडी घेण्याकरिता दोन लाख रुपये आणावेत यासाठी मारहाण करुन छळ केला तसेच पतीने तीनवेळा तलाक बोलून बेकायदेशीररित्या तलाक दिल्याची घटना नेवासा तालुक्यात घडली.

 

याप्रकरणी घोगरगाव येथील माहेर असलेल्या महिलेने नेवासा पोलीस ठाण्यात दिली असून त्यावरून वैजापूर तालुक्यातील सासरच्या व्यक्तींवर हुंड्यासाठी छळ तसेच मुस्लिम महिला विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

 

महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 1 जानेवारी 2021 रोजी माझे लग्न अफसर शब्बीरअली सय्यद रा. डवाळा, ता. वैजापूर याचेबरोबर खोकरफाटा ता. श्रीरामपूर येथील मंगल कार्यालयात झाले होते. दि. 30 मे 2022 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मी माझे सासरी नांदत असताना माझे पती अफसर सय्यद, नणंद यास्मीन मेहबूब बेग, रा. डवाळा, ता. वैजापूर, नणंद आफरीन मुस्ताक शेख, रा. रस्तेसुरेगाव, ता. येवला, जि. नाशिक असे एकत्रित येऊन तुझ्या आई वडिलांनी भांडेकुडे, सोने-नाणे कमी दिले. तू चारचाकी गाडी घेण्याकरिता तुझ्या वडिलांकडून दोन लाख रूपये आण अशी मागणी केली.

 

मी वडिलांची परिस्थिती गरीबीची असून त्यांचेकडे पैसे नाहीत असे सांगितले असता पती अफसर याने मला लाकडी काठीने पाठीवर, खांद्यावर, हातावर मारहाण केली तसेच लाथाबुक्क्याने मारहाण करून दोनही नंदांनी शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच मला माझे पती तीन वेळा तलाक, तलाक, तलाक असे बोलून बेकायदेशिररित्या तलाक दिला.

 

त्यानंतर मी माझे माहेरी फोन करून सर्व प्रकार सांगितला त्यानंतर दुसर्‍या दिवशी माझी आई रुक्साना व भाऊ अरबाज माझे सासरी आले. त्यानंतर त्यांनादेखील माझे पती व दोन्ही नणंदा म्हणाल्या की, तुम्ही जर आम्हाला सोन्याची अंगठी दिली तरच आम्ही तीला नांदवू. नाहीतर आम्ही नांदवणार नाही असे म्हणून त्यांनादेखील शिवीगाळ दमदाटी केली. म्हणून माझी माझे पती अफसर शब्बीर अली सय्यद, नणंद यास्मीन मेहबुब बेग (दोघेही रा. डवाळा ता. वैजापूर) व नणंद आफरीन मुस्ताक शेख (रा. रस्तेसुरेगाव ता. येवला जि. नाशिक) यांचेविरूध्द कायदेशिर फिर्याद आहे.

 

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी महिलेच्या पती व दोन नणंदांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 498(अ), 323, 324, 504, 506, 34 तसेच मुस्लीम महिला विवाहाच्या अधिकारांचे संरक्षण कायदा 2019 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button