अहमदनगर

धक्कादायक: बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे गेला महिलेचा जीव

अहमदनगर- रूईछत्तीशी (ता. नगर) गावात बोगस डॉक्टर आढळून आला आहे. या बोगस डॉक्टराने केलेल्या उपचारामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचे समजते. त्या महिलेच्या नातेवाईकांनी यासंदर्भात पोलिसांशी रात्री उशिरापर्यंत संपर्क केला नव्हता.

 

दरम्यान नगर तालुका आरोग्य विभाग व नगर तालुका पोलिसांनी मंगळवारी टाकलेल्या छाप्यात या बोगस डॉक्टरचे कारनामे समोर आले आहे. ज्ञानदेव निवृत्ती पवार (वय 63) असे त्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

रूईछत्तीशी गावात बोगस डॉक्टर असल्याची माहिती नगर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत नगर तालुका पोलिशांची संपर्क साधला. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांचे पथक आरोग्य विभागाच्या मदतीसाठी गेले.

 

त्यांच्या संयुक्त पथकाने पंचासमक्ष पवार याच्या सुरू असलेल्या दावाखान्यात छापा टाकला. तेथे मोठ्या प्रमाणात गोळ्या-औषधांचा साठा मिळून आला. पथकाने छापा टाकला असता पवार हा रूग्णांवर उपचार करत असताना मिळून आला. दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील डॉ.डी.बी. बोस या नावाने ज्ञानदेव पवार हा त्याचा दावाखाना चालवित असल्याचे समोर आले आहे.

 

पोलिसांनी डॉ. बोस यांच्याशी संपर्क साधला आहे. यासंदर्भात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पवार याच्यावर यापूर्वी देखील नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button